अकोले : पनीर व खव्यामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. दूध भेसळीविरोधात शासनाने कठोर पावले उचलली असल्याचेही त्यांनी सांगितले. अगस्ति मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

अकोले शहराजवळील अगस्ति ऋषी मंदिराच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन योजना निधीतून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून सभामंडप आणि संरक्षक भिंतींच्या कामांचे भूमिपूजन झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.आमदार डॉ.किरण लहामटे नगरविकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी,अगस्ति ऋषी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष वकील के.डी.धुमाळ व अन्य विश्वस्त, माजी नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी आदी या वेळी उपस्थित होते.

सामाजिक दायित्व निधीतून अगस्ति ऋषी मंदिरासाठी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल असे आश्वासन देताना राज्य शासन मंदिराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.

अगस्ति महाराजांचे दर्शन व महापूजेचा लाभ घेण्याने आनंद झाल्याचे नमूद करून मंत्री झिरवाळ म्हणाले, अगस्ति ऋषींची महती संपूर्ण देशभर पसरलेली आहे. प्रभू रामचंद्र या आश्रमात तीन दिवस वास्तव्यास होते. असे पवित्र स्थान देशभरात अन्यत्र क्वचित कोठे असेल असे ते म्हणाले.
दूध भेसळीबाबत शासनाने कठोर पावले उचलली असून मुंबई मधील चार नाके सील करण्यात आले.एकुण ९८ टँकर तपासण्यात आले.त्या पैकी काही परत पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

आमदार लहामटे म्हणाले नामदार झिरवाळ यांच्या उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनेक चढ उतार पाहिले.पैसा भरती आरक्षण प्रश्न याबाबत त्यांचे कामाची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल.दूध भेसळीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला तर त्यांचे नाव नेहमी स्मरणात राहील. मंदिराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.

उपसचिव विजय चौधरी म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागात नुकतीच २८० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामध्ये अकोले तालुक्यातील आठ उमेदवारांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. के. डी. धुमाळ यांनी केले.

अकोले शहराजवळ प्रवरा नदीच्या तीरावर अगस्ति आश्रमाचा परिसर आहे. तेथे महामुनी अगस्ती ऋषींचे प्राचीन मंदिर आहे.अगस्ती पत्नी लोपामुद्रा तसेच अन्य मंदिरेही आश्रम परिसरात आहेत. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.लाखो भाविक या दिवशी दर्शनासाठी येत असतात. यात्रेसाठी मंदिर ट्रस्ट कडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.मंदिर फुलांनी सजविण्यात आले असून मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. आज पहाटे मंत्री झिरवाळ तसेच आमदार डॉ लहामटे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.या नंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनाला खुले करण्यात आले. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनाला गर्दी केली आहे.

तालुक्यातील हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रश्वराचे पुरातन मंदिर तसेच रतनगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या रतनवाडी येथील अमृतेश्वराचे मंदिर या प्राचीन मंदिरांच्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भरणाऱ्या यात्राही महत्वाच्या मानल्या जातात.त्या शिवाय अकोले तालुक्यात केळीरुम्हणवाडी येथील केळेश्वर,कोतुळ येथील कोतुळेश्वर,लिंगदेव येथील लिंगेश्वर अशी अनेक प्राचीन शिवमंदिरे असून तेथेही महाशिवरात्री निमित्ताने यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वच शिवमंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

Story img Loader