लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच निवडणूक आचारसंहितेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. जिल्हय़ातील दोन्ही मतदारसंघात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर होताच जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या अनुषंगानेच आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आचारसंहितेबाबत विविध सूचना केल्या. नगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी कवडे हेच आहेत, तर शिर्डीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील बारा विधानसभा मतदारसंघनिहाय बारा सह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. उमेदवारांसाठी अवश्य असणाऱ्या विविध परवानगीबाबतची तांत्रिक माहितीही देण्यात आली असून, विविध खात्यांच्या या परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवण्याचा प्रयत्न आहे असे कवडे यांनी सांगितले.
आचारसंहितेच्या काळात उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रचार यंत्रणेचे छायाचित्रीकरण करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय व्हीडीओ पथके, भरारी पथके, संख्यात्मक पाहणी पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. उमेदवारांकडून दैनंदिन खर्चाचा तपशील मागवून त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे अशी माहिती कवडे यांनी दिली. जिल्हय़ातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीअर्ज नगरलाच दाखल करून घेण्यात येणार आहेत. मतदारांची नोंदणी सुरूच असून लोकांनी त्यांचे नाव यादीत आहे की नाही, याची खातरजमा करून नसल्यास उमेदवारीअर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे दि. २६ मार्चपर्यंत ही नावे समाविष्ट करण्यात येतील असे कवडे यांनी सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव या वेळी उपस्थित होते.
जिल्हय़ातील मतदारसंख्या- ३१ लाख १९ हजार ७११ (१६ लाख ४६ हजार ९०३ पुरुष, १४ लाख ७२ हजार ७९७ महिला).
नगर लोकसभा (क्रमांक- ३७)- १६ लाख ७२ हजार २८२ (८ लाख ८५ हजार ८१५ पुरुष, ७ लाख ८६ हजार ४५८ महिला)
शिर्डी लोकसभा (क्रमांक-३८)- १४ लाख ४७ हजार ४२९ (७ लाख ६१ हजार ९० पुरुष, ६ लाख ८६ हजार ३३९ महिला).

विधानसभा मतदारसंघनिहाय संख्या : नगर लोकसभा- शेवगाव- ३ लाख ४ हजार १८०, राहुरी- २ लाख ५३ हजार ७१४, पारनेर- २ लाख ८४ हजार ६३७, नगर शहर- २ लाख ५० हजार ९००, श्रीगोंदे- २ लाख ८२ हजार ९८५ आणि कर्जत-जामखेड- २ लाख ८५ हजार ८६६.
शिर्डी लोकसभा- अकोले- २ लाख ३० ९३६, संगमनेर २ लाख ४६ हजार १६५, शिर्डी- २ लाख ४१ हजार ८४६, कोपरगाव- २ लाख ३७ हजार १०९, श्रीरामपूर- २ लाख ५८ हजार ४७७ आणि नेवासे २ लाख ३२ ८९६.
 
जिल्हय़ातील मतदान केंद्र- ३ हजार ५६७
कर्मचारी- सुमारे १७ हजार ५००

Story img Loader