लोकसत्ता वार्ताहर
कर्जत : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण पुणे हत्या करण्यात आली आणि न्यायालयामध्ये दाखवलेल्या फोटोमधून हे लक्षात येताच त्याचे तीव्र पडसाद सलग दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्ज व श्रीगोंदा या दोन तालुक्यांमध्ये उमटले आहेत. आज दिनांक पाच मार्च रोजी या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
कर्जत येथे सकल मराठा समाज यांच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये अनेक अनेक गावांमध्ये बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.
या घटनेनंतर काल राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यांना या घटनेमध्ये जबाबदार धरून सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी प्रामुख्याने कर्जत व श्रीगोंदा या दोन्ही तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक व विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. या घटनेतील सर्व आरोपी अद्यापही अटक झालेले नाहीत.
याप्रकरणी राजकीय दबाव आणि राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्याचा आरोप यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक रावसाहेब धांडे व राहुल नवले यांनी केला आहे. या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी. जी आरोपी फरार आहेत त्यांना अटक का होत नाही. नेमकी त्यांच्याबाबत काय घडले आहे याची माहिती सर्व जनतेला सरकारने सांगावी. तसेच या घटनेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.
आज सकाळपासून ठीक ठिकाणी असणारे आठवडे बाजार देखील बंद ठेवण्यात आले आहेत. या बंदमधून शाळा कॉलेज महाविद्यालय व अत्यावश्यक सेवा यांना वगळण्यात आले आहे. मात्र इतर सर्व दुकाने व्यापार व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे दिसून येत आहे. गावोगावी आंदोलकांनी सकाळी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध देखील केला आहे.