गुन्हेगारीने बरबटलेल्या समाजाचे दु:ख मी जवळून पाहिले, सोसले. अन्यायाविरुद्ध संघर्ष करत या उपेक्षित समाजासाठी आयुष्य खर्च केले. त्यातूनच माझे साहित्य निर्माण झाले, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांनी आपल्या साहित्यनिर्मितीची वेदनाकारक प्रक्रिया कथन केली. चिपळूण येथे पुढील महिन्यात भरणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त सावर्डे येथे दोन दिवसांचे संमेलनपूर्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. चिपळूण तालुक्यातील साहित्यप्रेमींचा संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रसिद्ध कवी प्रा. अशोक बागवे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी संमेलनाध्यक्षपदावरून बोलताना डॉ. गस्ती म्हणाले की, मी कन्नड भागात जन्माला आलो. पण मला मराठी भाषेने घडवले. जीवनात धगधगता संघर्षच वाटय़ाला आला. पण खचलो नाही. माझ्या समाजाला बाहेर काढण्याचा लढा सुरू असतानाच ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनी लिहिते केले. त्यातूनच आक्रोश हे पुस्तक निर्माण झाले. फाटक्या माणसांना माणसात आणण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला. पण बरबाद होणाऱ्या माणसांसाठी काही तरी करण्याची प्रेरणा मिळाल्याने मी घडत गेलो आणि साहित्याने मला मोठे केले.  साहित्य संमेलनाचे मार्गदर्शक नाना जोशी, अरविंद जाधव, चिपळूणच्या नगराध्यक्ष सावित्री होमकळस, डॉ. तानाजी चोरगे, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, संजय भुस्कुटे, अनुराधा निकम इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. संमेलनाची यजमान संस्था लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे व इतर मान्यवरांनी या प्रसंगी ग्रंथपूजन केले. सह्य़ाद्री शिक्षण संस्थेच्या विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन इत्यादी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा