एजाजहुसेन मुजावर
सोलापूर : देशात सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील राजकारण, सहकार आदी क्षेत्रांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आतापर्यंत मोठे वर्चस्व होते. त्यांच्या निष्ठावंतांपैकी अनेक जण तालुका पातळीवर साखर कारखाने व इतर संस्थांच्या माध्यमातून पुढे आले. मात्र आतापर्यंत प्रत्यक्ष पवार कुटुंबीयांपैकी स्वत: कोणी साखर कारखाना चालविण्यासाठी पुढे आले नव्हते. आमदार रोहित पवार यांनी बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना २५ वर्षे भाडे कराराने चालविण्यासाठी केलेले प्रयत्न अखेर अयशस्वी झाले आहेत.
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या ताब्यात हा कारखाना जाऊ न देण्यासाठी अर्थात आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परिणामी, आदिनाथ कारखाना स्थानिक नेत्यांच्या ताब्यात कायम राहिला आहे. यातून कारखान्याच्या गाळप हंगामासाठी धुराडे पेटले आहे. करमाळा तालुक्यात शेलगाव-भाळवणीच्या माळरानावर उभारलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे मोठे योगदान लाभले होते. त्यांचे पुत्र विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मदतीने २७ वर्षांपूर्वी अखेर रखडत रखडत हा कारखाना सुरू झाला खरा; परंतु मोहिते-पाटील व शरद पवार यांच्यातील शीतयुद्धामुळे आदिनाथ कारखाना सतत राजकारणाचा अड्डा बनत गेला. जेमतेम २५० मे. टन गाळप क्षमतेचा हा कारखाना प्रगतीचे शिखर गाठू शकला नाही. संचालक मंडळाचे अंतर्गत मतभेद, योग्य नियोजनाचा अभाव, गैरव्यवस्थापन यामुळे या कारखान्यावरील कर्जाचा डोंगर वाढत राहिला. ऊसपुरवठा केलेल्या सभासद शेतकऱ्यांची देयके वेळेवर देण्याची तसेच कामगारांचे वेतन अदा करण्याची क्षमता हरवून बसलेला हा कारखाना तीन वर्षांपूर्वी बंद पडला होता. राज्य शिखर बँकेच्या सुमारे १२८ कोटींच्या थकीत कर्जासह शेतकरी व कामगारांची देणी डोक्यावर होती. या पार्श्वभूमीवर अखेर गेल्या वर्षी राज्य शिखर बँकेने आदिनाथ साखर कारखान्याचा लिलाव पुकारला असता करमाळा तालुक्यास खेटून असलेल्या नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आपल्या बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून आदिनाथ साखर कारखाना २५ वर्षे भाडे कराराने चालविण्यासाठी घेण्यासाठी पुढे आले. परंतु तब्बल २५ वर्षे भाडे कराराने आदिनाथ कारखाना चालविण्यासाठी देण्यास स्थानिकांचा विरोध होऊ लागला. कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डागे व इतरांनी मोठय़ा कष्टाने स्वत: आणि सभासद शेतकऱ्यांकडून भागभांडवलापोटी काही रक्कम उभी करून स्वत: कारखाना चालविण्यासाठी धडपड सुरू केली.
दरम्यान, आदिनाथ कारखान्यावर गेली १५ वर्षे वर्चस्व ठेवणाऱ्या पूर्वाश्रमीच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील आणि रश्मी बागल एकमेकांचे कट्टर वैरी. परंतु गेल्या जूनअखेरीस राज्यात सत्ताबदल होऊन एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यामुळे एकंदरीत राजकीय समीकरण बदलले. त्याचा परिणाम आदिनाथ साखर कारखान्याशी संबंधित घडामोडींवर झाला. आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोकडे आदिनाथ कारखाना कोणत्याही परिस्थितीत जाऊ नये म्हणून माजी आमदार नारायण पाटील व इतरांनी कंबर कसली. त्यासाठी मूळ मोहिते-पाटील गटाचे मानले जाणारे नारायण पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यातून आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांचाही आदिनाथशी संबंधित घडामोडींवर डोळा होता. त्यांनी आदिनाथ कारखाना बारामती अॅग्रोच्या ताब्यात जाण्याची प्रक्रिया रोखून धरली. यात आमदार रोहित पवार आणि प्रा. तानाजी सावंत यांच्यात झालेल्या संघर्षांत प्रा. सावंत यांचा डाव यशस्वी होऊन आदिनाथ कारखाना बारामती अॅग्रोकडे न जाता मूळ सभासद शेतकऱ्यांच्याच ताब्यात कायम राहिला आहे.