महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ज्येष्ठ नागरिक, तसेच विविध सामाजिक घटकांना प्रवासभाड्यात सवलत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
एसटी महामंडळाच्या वतीने विविध घटकांसाठी १ जून २०१९ पासून स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली असून आतार्यंत या योजनेसाटी ३० लाखांहून अधिक व्यक्तींची नोंद झाली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिक, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विद्यार्थी तसेच रुग्णांना स्मार्ट कार्ड देण्यात येते.
१ सप्टेंबर २०२२ पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक –
करोना संसर्ग, एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे एसटीच्या विभागीय कार्यालयात स्मार्ट कार्ड नोंदणीकरण आणि वितरण करता आले नाही. या योजनेला ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता पुन्हा एकदा ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा असल्यामुळे या यात्रेमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०२२ पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक केले जाणार आहे.