पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी आणखी कितीवेळा कॅम्पसमधील भिंती तोडणार? असा प्रश्नही विद्यार्थी संघटनाकडून उपस्थित करण्यात आला आहे.
पार्कींगसाठी तोडली भींत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात डिजीटल पद्धतीने विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, या कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्यांसाठी पार्कींगची सुविधा व्हावी, यासाठी मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडण्यात आल्याने विविध विद्यार्थांंनी आक्षेप घेतला आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी आणखी किती वेळा कॅम्पसमधील भिंती तोडणार? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी महापालिकेला विचारला आहे.
विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केला संताप
यासंदर्भात बोलताना, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नेते अमोल माटेले म्हणाले, ”कलिना कॅम्पसची भिंत पाडून मुंबई महापालिका आणि विद्यापाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांची विशेषत: मुलींची सुरक्षा धोक्यात आणली आहे. तसेच राजकीय कार्यक्रमांसाठी विद्यापीठाचा कॅम्पस वापरणे कितपीत योग्य आहे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. याबरोबच युवासेनेही यावर आक्षेप नोंदवला आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येणाऱ्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. मात्र, तरीही महापालिकेने भिंत पाडून रस्ता तयार केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे नेते प्रदीप सावंत यांनी दिली आहे.
हेही वाचा – पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मुंबईत कडेकोट सुरक्षा; जाहीर सभेत शक्तिप्रदर्शनाने महापालिका निवडणुकीचे रणशिंग
विद्यापीठ प्रशासनाची भूमिका काय?
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी येणाऱ्यांना जवळच पार्कींग सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ही भिंत तोडण्यात आली असून आजच्या कार्यक्रमानंतर मुंबई महापालिकेकडून ही भित पुन्हा बांधण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.