महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी वनसेवा भरतीची मुख्य परीक्षा येत्या २७, २८ सप्टेंबरला होणार असली, तरी आयोगाने गेल्या २७ एप्रिलला घेतलेल्या वनसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल ४ महिने होत आले, तरी अजूनही लागू शकला नाही. पहिल्या परीक्षेचा निकाल जाहीर न झाल्याने मुख्य परीक्षेच्या तयारीबाबत परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पूर्वपरीक्षेचा निकाल का लांबला व तो कधी जाहीर केला जाणार, याची आयोगाकडून कोणतीच माहिती दिली जात नसल्याने दाद मागायची तरी कोठे, असा या त्रस्त विद्यार्थ्यांचा सवाल आहे.
गेल्या एप्रिलमध्ये वनसेवा विभागाची पूर्वपरीक्षा दिलेल्या काही विद्यार्थ्यांनी आयोगाच्या या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ही परीक्षा झाल्यावर १५ जूनला या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाने प्रसिद्ध केली. परंतु दोन महिने उलटूनही निकाल जाहीर केला नाही. वनसेवा मुख्य परीक्षा पूर्वघोषित वेळापत्रकानुसार २७, २८ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे. मात्र, आधी घेतलेल्या परीक्षेचा निकाल रखडल्याने पुढच्या परीक्षेच्या तयारीविषयी परीक्षार्थी विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. परीक्षेप्रमाणेच निकालाचेही पूर्वघोषित केले जाणारे वेळापत्रक तयार करून काटेकोर पाळले जाणे आवश्यक असल्याची भावना या विद्यार्थ्यांनी पत्रकान्वये व्यक्त केली. वनसेवा विभागाची ही परीक्षा देण्यासाठी बीएस्सी (अॅग्री) व अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी पात्र ठरतात. औरंगाबादसह मुंबई, पुणे व नागपूर अशा चार ठिकाणी ही परीक्षा घेतली जाते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनच घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला राज्यभरात सुमारे तीन लाख विद्यार्थी बसतात व या परीक्षेचा निकालही २-३ महिन्यांत लावला जातो. परंतु या तुलनेत लाखापेक्षाही कमी विद्यार्थी देत असलेल्या वनसेवा परीक्षेच्या निकालास उशीर का लावला जातो, असा या विद्यार्थ्यांचा सवाल आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा