वाई : अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने (नासा) सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेमध्ये माळवाडी (ता. माण) येथील विद्यार्थी संशोधक विनायक दोलताडे यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी गटाने अवकाशातील एका लघुग्रहाचा शोध लावण्यात यश मिळविले आहे. दरम्यान या शोधावर नासाचे अंतिम शिक्कामोर्तब बाकी आहे.
नासा, पॅन स्टार्स, कॅटालीना स्काय सर्वे आणि टेक्सास येथील हर्डीन सिमन्स युनिव्हर्सिटी यांच्याकडून १ ते २७ सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोधमोहीम घेण्यात आली होती. या अंतर्गत गटामध्ये दोलताडे यांच्या नेतृत्वाखाली आनंद कांबळे, संकेत दळवी, वैभव सावंत, मनीष जाधव, गौरव डाहुले या विद्यार्थ्यांच्या गटाने संशोधन केले. या गटाने एका लघुग्रहाचा शोध लावण्यात यश मिळविले असून त्याची नोंद नासाकडे करण्यात आली आहे. तीन ते पाच वर्षे त्याच्या स्थितीचे व हालचालींचे निरीक्षण घेऊन नंतर याचा समावेश नासाच्या खगोलीय घटकांच्या यादीमध्ये करण्यात येणार आहे. या गटाचा प्रमुख विनायक हा एका मेंढपाळाचा मुलगा असून त्याचे प्राथमिक शिक्षण रांजणी (ता.माण, जि. सातारा) येथे तर माध्यमिक शिक्षण जिल्ह्य़ातील म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले आहे. यानंतर त्याने आणि त्याच्या गटातील गौरव आणि वैभव यांनी त्यांचे उच्चशिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागातून केले. तर या गटातील मनीष, आनंद आणि संकेत यांनी पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयातून भूगोल विषयाची पदवी प्राप्त केली आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या विनायकने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे व त्याच्या गटाचे अभिनंदन होत आहे.