विद्यार्थ्यांचा निकाल अद्ययावत करण्यात महाविद्यालयांची कुचराई
आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेली व्यावसायिक अभ्यासक्रमांची ईबीसी सवलत रखडली आहे. महिनाभरापर्यंत निधीच्या कारणावरून न मिळालेली सवलत आता विद्यार्थ्यांचे निकाल अद्ययावत करण्याच्या मुद्यावर निधीचे वितरण थांबविण्यात आले आहे. त्यामुळे सत्र २०१५-१६ च्या प्रतिपूर्तीची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. अमरावती विभागातील काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे निकाल अद्ययावत करण्यात कुचराई करण्यात येत आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या वाढत्या शुल्कामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी या सवलतीच्या उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या ही सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ५० टक्के शुल्क शासन भरणार आहे. ही सवलत पदविका, पदवी, पदव्युत्तर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, कृषी अभ्यासक्रम, दुग्धव्यवसाय आणि प्राणिशास्त्र आदी अभ्यासक्रमांसाठी लागू आहे. यंदा शासनाने उत्पन्न मर्यादा वाढवून अधिक विद्यार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अमरावती विभागासह राज्यातील काही महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची गेल्या सत्राची प्रतिपूर्ती रखडल्याची माहिती आहे. सवलतीचा गैरफायदा होऊ नये म्हणून, प्रतिपूर्ती करण्याअगोदर उच्च व तंत्र विभागाकडून सखोल तपासणी करण्यात येत आहे. त्यात महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या संपूर्ण माहितीसह अनेकदा प्रस्ताव मागविण्यात आले. त्यासाठी प्रथम ऑनलाइन व त्यानंतर पुन्हा ऑफलाइन माहिती मागविण्यात आली. या पडताळणीत ऑनलाइन व ऑफलाइनचाही प्रचंड गोंधळ झाला. शासकीय महाविद्यालतील प्राध्यापकांनाही प्रशासकीय कामात जुंपले. विद्यार्थ्यांचे आधार कार्डही लिंक करण्याचे निर्देश महाविद्यालयांना देण्यात आले. त्यानंतर ३१ मार्च २०१६ च्या आदेशानुसार महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती आणि निकाल अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याकडे काही महाविद्यालय दुर्लक्ष करीत आहे. या सवलतीचा निधी सहसंचालक कार्यालयात आला आहे. मात्र, निकाल अद्ययावत केल्याशिवाय तो वितरित न करण्याचा निर्णय असल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे.
बहुतांश महाविद्यालयांकडून अगोदरच संपूर्ण शैक्षणिक शुल्क घेण्यात येते. ईबीसी सवलतीची प्रतिपूर्ती झाल्यानंतर विद्याथ्यार्ंच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाते. या अगोदर सत्र २०१४-१५ मध्ये महाविद्यालयांच्या खात्यात हा निधी जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यात त्याचे समायोजन करण्यात आले होते. सत्र २०१५-१६ च्या सवलतीची विद्यार्थ्यांना दीड वर्षांपासून प्रतीक्षा आहे.
अनेक महाविद्यालयांनी अगोदरच संपूर्ण शुल्क घेतल्याने या सवलत प्रतिपूर्तीसाठी पाठपुराव्याकडे दुर्लक्ष केले आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. गेल्या वर्षीची सवलत न मिळाल्याने यंदा प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयांचे भरमसाठ शुल्क भरतांना पालक अडचणीत सापडला. ईबीसी सवलतीच्या प्रतिपूर्तीअभावी अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षण अपूर्ण सोडण्याचीही वेळ आली.
यंदा ईबीसी सवलतीसाठी अर्ज करण्याची मुदतही १५ नोव्हेंबरला संपल्यामुळे आता तरी महाविद्यालय निकाल अद्ययावत करून गेल्या वर्षीच्या सवलतीची प्रतिपूर्ती मिळवून देईल का, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे. व्यावसासिक अभ्यासक्रमांची सत्र २०१५-१६ ची ईबीसी सवलत काही महाविद्यालयांमध्ये रखडली आहे. त्यासाठी विविध प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यातच काही महाविद्यालयांमध्ये चौकशी समिती येऊन गेली, पण न केलेल्या प्रतिपूर्तीची समितीने कशी चौकशी केली, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला. या प्रकारावरून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा महाविद्यालयांना प्रत्यय आला.
सवलतीचे वाटप सुरू -डी.एन.शिंगाडे
शासनाकडून सुमारे १ महिन्याअगोदर ईबीसी सवलतीचा निधी प्राप्त झाला. ३१ मार्च २०१६ च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे निकाल अद्ययावत करणाऱ्या महाविद्यालांना निधीचे वितरण करण्यात येत आहे. काही महाविद्यालयांनी अद्याप माहिती न दिल्याने निधीचे वितरण करण्यात आले नाही, अशी माहिती अमरावती विभागाचे तंत्रशिक्षण सहसंचालक डी.एन.शिंगोडे यांनी दिली.