|| नीलेश पवार
नंदुरबार: इयत्ता १२ वीची परीक्षा उंबरठय़ावर आली असताना आदिवासी विकास विभागाच्या अनेक आश्रमशाळांमध्ये वर्षभरापासून शिक्षकांविना शिकविणेच झालेले नाही. त्यातच पुस्तके, वह्या, गणवेशासह रोजच्या आवश्यक गोष्टीसाठी शासनाकडून थेट बँक खात्यावर जमा होणारे अनुदानही दोन वर्षांपासून मिळाले नसल्याने मंगळवारी धडगाव तालुक्यातील मांडवी आश्रमशाळांच्या विद्यार्थिनींनी ६५ किलोमीटरची पायपीट करत तळोदा प्रकल्प कार्यालयात समस्या मांडल्या.
आदिवासी विकासमंत्री अॅड. के. सी. पाडवी यांच्या मतदारसंघातील या प्रकाराने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐरणीवर आल्या आहेत.
मांडवी येथील आश्रमशाळेतील इयत्ता १२ वीच्या विद्यार्थिनींनी तळोदा आदिवासी प्रकल्प कार्यालय पायपीट करून गाठले. सकाळी सहा वाजता आश्रमशाळेतून निघालेल्या ५० पेक्षा अधिक विद्यार्थिनी दुपारी अडीच वाजता तळोदा प्रकल्प कार्यालयात पोहोचल्या. भौतिकशास्त्राच्या पुस्तकातील एक शब्दही त्यांना शिकवला गेला नाही. शिक्षकच नसल्याने शिकवणार कोण, परीक्षेत लिहू काय, असा प्रश्न या विद्यार्थिनींनी केला आहे.
आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. ही समस्या सुटेपर्यंत रोजंदारीवर शिक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे. डीबीटी अनुदानाचा प्रश्न आदिवासी विकास आयुक्तालयांमार्फत हाताळण्यात येतो. आम्ही फक्त माहिती पुरवीत असतो. –
मैनत घोष ( प्रकल्प अधिकारी, तळोदा)