उमरगा तालुक्यातील मुळज येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावरून पेपर संपल्यानंतर गावाकडे जाणाऱ्या मुलींना गावगुंडांनी बेदम मारहाण केली. सहाआसनी रिक्षासमोर सायकल आडवी लावून या गुंडांनी मुलींची छेड काढत हैदोस घातला. छेडछाडीस मज्जाव करणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत ९ मुली व ३ मुले जखमी झाली. या प्रकरणी शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दहावीचा पेपर संपल्यानंतर उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील विद्यार्थिनी परीक्षा केंद्र असलेल्या मुळजहून दुपारी दीडच्या सुमारास गावी परतत होत्या. याच वेळी मुळज येथील काही टवाळखोरांनी त्यांची छेड काढली. छेड काढल्यानंतर त्रिकोळी येथील मुलांनी पुढे येत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांची मध्यस्थी सहन न झाल्यामुळे सहाआसनी रिक्षाने गावाकडे निघालेल्या मुलींना मुळज येथील ओढय़ाजवळ सायकल आडवी लावून गावगुंडांनी अडविले व रिक्षातून खाली उतरवून मुलींना बेदम मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शाळकरी मुली प्रचंड घाबरल्या. मारहाण करणाऱ्या एकाला पकडून मुलींनीही चोपही दिला. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्रिकोळीमधील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन मुलींना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
 शिक्षक विश्वजित दुबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश तुकाराम मित्री, नितीन दगडू जमादार, लक्ष्मण जमादार, विष्णू जमादार, सचिन जमादार आणि प्रकाश वडतरे या गावगुंडांविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader