आपल्या विविध वक्तव्यांमुळे काय चर्चेत राहणारे बडनेराचे आमदार आमदार रवी राणा यांनी आता आणखी एक खळबळजनक विधान केलं आहे. रवी राणा यांनी राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सुभाष देसाईंनी एमआयडीसीच्या भूखंडांमध्ये कोट्यवधींचा मलिदा खाल्ला आणि मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनाही पोहचवला असल्याचे रवी राणा यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : शिंदे-फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर रवी राणांच्या दिलीगिरीवर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार रवी राणा म्हणाले, “विरोधक जे वारंवार सांगत आहेत की प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातकडे जात आहेत. यावर मला उद्धव ठाकरे आणि विरोधकांना सांगायचं आहे की, देवेंद्र फडणवीसांनी ते मुख्यमंत्री असताना जे प्रकल्प महाराष्ट्रात आणले होते आणि जे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू झाले होते, त्यापैकी अर्धे प्रकल्प उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर अडीच वर्षांत बंद पडले. टीका करणाऱ्यांनी अगोदर याचे उत्तर दिले पाहिजे. सुभाष देसाई जे उद्योगमंत्री होते त्यांचीही चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करतो. कारण, जिथे एमआयडीसीमध्ये उद्यानाचे भूखंड होते, झाडे लावण्यासाठी असलेल्या या भूखंडांचे व्यावसायिक भूखंडांमध्ये रुपांतर करून कोट्यावधींचा मलिदा खाल्ला आहे आणि तो मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना पोहचवला आहे. याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मी मागणी करतो.”

हेही वाचा : “वाईट या गोष्टीचं वाटतय की जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय; मला वाटतं पंतप्रधानांनी…” ; राज ठाकरेंच विधान!

याशिवाय “ मला वाटतं हा देश चालविण्यासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह सक्षमपणे काम करत आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनात राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. महाराष्ट्रासाठी अडीच वर्षात उद्धव ठाकरे जे करू शकले नाहीत, ते केवळ तीन महिन्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी काम केलं आहे. राज्याच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासासाठी हे सरकार मजबूत आहे.” असही आमदार रवी राणा यावेळी म्हणाले.