‘लोकमंगल’चा खुलासा

लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने दुग्धशाळा विस्तारीकरण आणि दूध भुकटी प्रकल्प मंजूर होण्यासाठी शासनाला सादर केल्यानंतर कोणी तरी अज्ञात व्यक्तींनी राजकीय द्वेषापोटी प्रकल्पाची खरी कागदपत्रे परस्पर बदलल्याची शंका उपस्थित करीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना बदनाम करण्याचा हा सारा खटाटोप असल्याचा खुलासा देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे. आश्चर्य म्हणजे हा खुलासा करणाऱ्या मनीष देशमुख यांचा लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीशी कसलाही संबंध नाही. त्यांचे बंधू रोहन देशमुख हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

शासनाकडे प्रकल्प मंजूर होण्यासाठी शासनाकडे अधिकृत कागदपत्रांसह  सादर केल्यानंतर ही कागदपत्रे शासनाच्या ताब्यात असतानादेखील कोणी तरी अज्ञात व्यक्तींनी त्यात परस्पर फेरफार करून अधिक कागदपत्रे काढून खोटी आणि बनावट कागदपत्रे घातल्याचे जेव्हा निदर्शनास आले, तेव्हा या गंभीर प्रकाराची स्वतंत्र तक्रार कोठे आणि केव्हा केली अगर कसे, असे विचारले असता मनीष देशमुख यांनी अशी स्वतंत्र तक्रार अद्यापि केली नसल्याचे मान्य केले. शेतकरी आणि दूध व्यावसायिकांना करण्याच्या हेतूने लोकमंगल मल्टिस्टेट सोसायटीने दूधशाळा विस्तारीकरण व दूध भुकटी प्रकल्प मंजूर करून घेतला होता. या माध्यमातून होऊ घातलेल्या विकासकामाला विरोधकांनी खोडा घातल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.