पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी नाहीत, असं म्हणत माजी खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत चर्चा करण्यासाठी पंढरपूर येथे आले होते. या चर्चेनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवरही टीका केली.
काय म्हणाले सुब्रह्मण्यम स्वामी?
डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी हे आज पंढरपुरात आले असताना त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना मंदिरं सरकारमुक्त करण्याबाबत पंतप्रधानांची भेट घेणार का? असं विचारलं असता, “पंतप्रधान मोदी हे कोणाचेच ऐकत नसून ते हिंदुत्त्वावादी नाहीत, त्यांनी उत्तराखंडमधील सर्व मंदिरं आपल्या ताब्यात घेतली आहेत, ज्यांना असं वाटतं की पंतप्रधान मोदी चांगले काम करत आहेत, ते सर्व मोदींचे चमचे आहेत”, अशी प्रतिक्रिया स्वामी यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारबाबतही प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्रामधील शिंदे-फडणवीस सरकार शिवसेना तोडून बनवण्यात आले असून हे सरकार अनैतिक आहे. त्यांचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – …म्हणून आज अंबानी दान करणार ३०० किलो सोनं! मुंबईत विशेष कार्यक्रमाचंही करण्यात आलं आयोजन
“मंदिरं ताब्यात घेण्याचा सरकारला अधिकार नाही”
“देशातील मंदिरं आपल्या ताब्यात घेण्याचा सरकारला कोणताही अधिकार नाही. जर मंदिर प्रशासनाकडून काही आर्थिक घोटाळा झाला असेल, तर सरकार काही महिन्यांसाठी मंदिरं आपल्या ताब्यात घेऊ शकतात. मात्र, प्रशासनाची आर्थिक घडी बसवल्यानंतर सरकारला मंदिरांचा ताबा सोडावा लागतो. संविधानाच्या कलम २५ नूसार सरकार कोणत्याही मंदिरांत हस्तक्षेप करू शकत नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही निर्णय दिला आहे.”, असेही ते म्हणाले. आज सरकारने मंदिरं आपल्या ताब्यात घेतली आहेत. मग सरकार चर्च आणि मशीदी आपल्या ताब्यात का घेत नाहीत? वक्फबोर्डात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, ते सरकार ताब्यात का घेत नाहीत? असा प्रश्नही स्वामी यांनी मोदी सरकारला विचारला.