उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे, तसेच अन्य विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने एका शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्यावर्षभरात सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान महाराष्ट्रात सहावेळा आहे. आपण निमंत्रण दिलं आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला, हा त्यांचा मोठेपणा आहे. म्हणून, आतापर्यंत २ लाख कोटींच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं आहे. आजही १४ हजार कोटींपेक्षा जास्त कामांचं लोकार्पण होतंय.
“निळवंडे धरणाचा इतिहास प्रत्येकाला माहित आहे. देवेंद्रजींनी सांगितलं की त्यांच्या जन्माआधी हा प्रकल्प सुरू झालाय, परंतु, मधे काय काय झालं त्या इतिहासात जाऊ इच्छित नाही. देवेंद्र मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या प्रकल्पाला चालना दिली. या प्रकल्पामुळे ६८ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे”, अशी माहितीही त्यांनी आज दिली.
“अडीच वर्षे सर्व प्रकल्प बंद होते, त्याला आपण चालना दिली. नवीन प्रकल्प सुरू केले. या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याकरता डबल इंजिनच्या सरकारची आवश्यकता असते. मोदींकडे ज्या गोष्टी मागितल्या ते देण्याचं काम केलं”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती
“मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघंच मंत्रिमंडळात होतो तेव्हा दुष्काळग्रस्त विभागांना, जिल्ह्यांना मराठवाडा, विदर्भात वाहून जाणारं पाणी तिथं वळवलं पाहिजे ही योजना मोठी आणली. पण योजना पूर्णत्वास नेणं राज्याच्या आर्थिक आवाक्याच्या बाहेरआहे. या योजनेला केंद्राने पाठिंबा दिला तर लाखो करोडो शेतकऱ्यांना फायदा होईल”, अशी विनंतही एकनाथ शिंदे यांनी केली.
मोदींच्या हाताला यशाच परीस
“गेल्या वर्षभरात घेतलेले निर्णय तुमच्या समोर आहेत. समृद्धी, मेट्रो, ३५ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली, ते कार्य पुढे नेत आहोत. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं काम सरकार करतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कामाला हात लावतात, भूमिपूजन करतात तो प्रकल्प वायूवेगाने पुढे जातो आणि पूर्ण होतो असा अनुभव आहे. त्यांच्या हाताला यशाचे परीस आहे. हात लावताच त्याचं सोनं होतं असा अनुभव आहे. म्हणून आम्ही त्यांना वारंवार बोलावतो”, असंही ते पुढे म्हणाले.