भाजपचे ‘मिशन २०१४’ यशस्वी होणे आवश्यक असून त्यासाठी नियोजनबद्ध व अथक परिश्रम करण्याची जबाबदारी सर्व नूतन पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस रवींद्र भुसारी यांनी केले.
नाशिक शहर भाजप कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
या वेळी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, प्रदेश सचिव सीमा हिरे, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय साने, सरचिटणीस बाळासाहेब सानप, संभाजी मोरुस्कर, प्रा. देवयानी फरांदे आदी उपस्थित होते. भुसारी यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा वाढवावी, ज्याजोगे पक्षाची व्याप्ती आपोआपच वाढेल, असे नमूद केले. युवा कार्यकर्त्यांनी सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबवावेत. घराघरांपर्यंत पक्षाच्या कार्याची ओळख पोहोचवावी, ज्यायोगे मिशन २०१४ यशस्वी करणे फारसे अवघड जाणार नाही. नैसर्गिक स्रोतांचे योग्य पद्धतीने नियोजन करून वापर केल्यास विकासाच्या दिशा आपोआपच खुल्या होतात याचे उदाहरण देताना त्यांनी छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात यांची पूर्वीची परिस्थिती व सध्याचा भरघोस विकास यांचे चित्र मांडले. हे फक्त उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचे योग्य पद्धतीने नियोजन व वापर झाल्यानेच शक्य झाले. हे फक्त भाजपच करू शकतो, असे भुसारी यांनी निदर्शनास आणून दिले.
सावजी यांनी जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांचा सुरेख संगम नवीन कार्यकारिणीत साधण्यात आला असल्याचे सांगितले. आगामी काळात सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्यासोबत असंख्य नवीन कार्यकर्त्यांना जोडून भाजपच्या प्रवाहात सामील करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शहर भाजपच्या १५ विविध समित्यांची घोषणा झाली असून १० समित्या लवकरच घोषित करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन सरचिटणीस सुनील केदार यांनी केले. आभार सरचिटणीस प्रशांत जाधव यांनी मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा