पुणे रेल्वे स्टेशनवर झालेल्या गोळीबारात जखमी झालेले पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लवकरच त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात येणार असून खबरदारी म्हणून उद्यापर्यंत वेंटिलेटरवर ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बुधवारी संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास आरोपींना पकडण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर गेलेल्या गजनान पवार यांच्यावर आरोपीने एकूण तीन गोळया झाडल्या. त्यातील दोन गोळया लागून पवार जखमी झाले. त्यांना लगेचच जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना रुग्णालयात आणले तेव्हा प्रकृती चिंताजनक होती. पण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे आता धोका टळला आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

पुण्यातील चंदननगरमधील आनंद पार्क परिसरात राहणाऱ्या एकता भाटी यांचा बुधवारी सकाळी गोळीबारात मृत्यू झाला होता. एकता यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी हा झेलम एक्स्प्रेसने फरार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलीस त्यांना पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर पोहोचले.

पोलिसांना पाहताच आरोपीने पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर गोळया झाडल्या. त्यात पवार जखमी झाले. बुधवारी दिवसभरात पुणे शहरात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या. चंदननगर पुणे रेल्वे स्टेशनसह येवलेवाडी भागातही बुधवारी गोळीबाराची घटना घडली. गणेश ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चार अज्ञातांनी दुकानातील कामगारावर गोळीबार करुन पळ काढला होता.