विरोधी पक्षनेते अजित पवार हे सोमवारी ( ८ मे ) सातारा दौऱ्यावर होते. तेव्हा अजित पवारांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. सध्या महाराष्ट्रात अराजकता माजली आहे. कोणीही मंत्री मंत्रालयात बसत नाही. आत्ताच्या सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार असून बदल्यांचे रेट ठरवले जात आहेत, अशी टीका अजित पवारांनी केली आहे. याला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
साताऱ्यातील कोरेगाव येथे बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात अजित पवार बोलत होते. “सध्या महाराष्ट्रामध्ये आराजकता माजली आहे. आत्ताच्या सरकारमध्ये कोण कोणाला विचारत नाही. कोणीही मंत्री मंत्रालयात बसत नाही. वेगवेगळी लोक मंत्रालयात फिरतात. पण, लोकांची काम होत नाहीत. या सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार असून, बदल्यांचे रेट ठरवले जात आहेत,” असं अजित पवारांनी म्हटलं.
हेही वाचा : “महाराष्ट्राचं चित्र बदलायचं ठरवलंय”, शरद पवारांच्या विधानावर विखे-पाटलांची टीका; म्हणाले, “अशा…”
“शिंदे-फडणवीसांची केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही, प्रश्न सोडविले जात नाहीत. आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राची पीछेहाट होत असल्याचं दिसून येते. जनतेच्या पैशातून सरसकट करोडो रुपये जाहिरातीवर खर्च होत आहे. वर्षभरात यांनी कोणतीही आढावा बैठक घेतली नाही. सध्याचे मंत्री काम करण्यापेक्षा इतरांना शिव्या घालण्यातच धन्यता मानत आहेत,” असंही अजित पवारांनी सांगितलं.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात कितीदा…”
‘कोणीही मंत्री मंत्रालयात बसत नाही,’ अजित पवारांच्या आरोपाला मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात कितीदा बसायचे याची श्वेतपत्रिका काढून लोकांना वाटा. उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या कार्यकाळात मंत्रालयात कार्यकाळात हजारो दारूच्या बाटल्या सापडल्या. हजारो दारूच्या बाटल्या सापडणं हे मंत्रालयाचं काम आहे का?,” असा सवाल मुनगंटीवारांनी उपस्थित केला आहे.