स्वप्निल लोणकर या एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी विरोधक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. एमपीएससीसंदर्भातले प्रश्न सोडवावेत, यासाठी सध्या सुरु असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार चर्चा सुरु आहे. स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याने सरकारने त्याच्या परिवाराला ५० लाखांची मदत त्वरीत जाहीर करावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या अधिवेशनात केली आहे.

स्वप्निलच्या परिवाराचं दुःख सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी कर्ज घेऊन मुलाला शिकवलं आहे, त्यामुळे तुम्ही जर दगडी हृदयाचे नसाल तर आत्ताच्या आत्ता त्यांच्या परिवाराला ५० लाखांची मदत करा, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. एमपीएससीच्या ४३० विद्यार्थ्यांनी सरकारला आत्मदहनाचा इशारा दिला आहे, ही बाबही त्यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केली. एक आमदार म्हणून हा विषय मुख्यमंत्री आणि सभागृहापर्यंत पोहचवा अशी मागणी विद्यार्थ्यांनी आपल्याकडे केल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर नोकरीच्या वयोमर्यादेत दोन वर्षांची वाढ करावी अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली आहे.

हेही वाचा- स्वप्निल लोणकर आत्महत्या : MPSC च्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार; अजित पवार यांची घोषणा

मुनगंटीवार पुढे म्हणतात, जे अधिकारी सेवानिवृत्तीच्या वयात आहेत, त्यांच्या कार्यकालात वाढ केली जाते. मात्र, नोकरीसाठीच्या वयोमर्यादेत वाढ होत नाही. दोन वर्षांपासून एमपीएससीच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत.

हे सरकार कठोर आणि दगडी काळजाचं आहे. सरकारला थोडी तरी शरम असेल तरी त्यांनी त्वरीत स्वप्निलच्या परिवाराला ५० लाखांची मदत करावी. १२ आमदारांवर सरकारचं राजकारण सुरु आहे. मात्र एमपीएससीचे सदस्य सरकारला अजून भरता आले नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे. सरकारचा निर्णय आंधळेपणाने घेतलेला आहे, असंही ते म्हणाले. पुन्हा कुठल्याही विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ नये यासाठी कार्यवाही करा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Story img Loader