आगामी लोकसभा निवडणुकीत आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने भाजपाला पराभूत करण्याचा निर्धार शुक्रवारी ( २३ जून ) महाआघाडीच्या बैठकीत झाला. या बैठकीला काँग्रेससह १५ विरोधी पक्ष उपस्थित होते. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे हेही बैठकीला उपस्थित होते. यावरून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींच्या समोर जाऊन हिंदुत्व समर्पित केलं,” असं टीकास्र मुनगंटीवार यांनी डागलं आहे.
“उद्धव ठाकरे सोनिया सेनेचे सदस्य झाले आहेत. उद्धव ठाकरे म्हणायचे, मेहबुबा मुफ्ती भाजपाबरोबर सरकार कसं स्थापन करू शकते. पण, मेहबुबा मुफ्ती या उद्धव ठाकरेंच्याच बाजूला बसल्या ही शोकांतिका आणि विटंबना आहे. उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींच्या समोर जाऊन हिंदुत्व समर्पित केलं, हे आश्चर्यजनक आहे,” असा हल्लाबोल मुनगंटीवार यांनी केला आहे.
हेही वाचा : “दोन वर्षापूर्वीच पंकजा मुंडेंना…”, ‘बीआरएस’च्या ऑफरवर असदुद्दीन ओवैसींची मोठा दावा; म्हणाले…
“फारूक अब्दुल्ला यांना उद्धव ठाकरे शिव्या द्यायचे, त्यांच्याच बाजूला ते बसले. कोणत्याही महाराष्ट्रातील नेत्याची इतकी दारूण अवस्था होते, याचं आम्हाला वाईट वाटतं,” असा टोला मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
“विरोधी पक्षांना देशापेक्षा स्वत:च्या भविष्याची चिंता जास्त आहे. पंतप्रधान मोदी २४ तास देशाच्या भविष्याची चिंता करत काम करण्याचा प्रयत्न करतात. पाटण्यात एकत्र येऊन विरोधकांना पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवता येत नाही,” असं मुनगंटीवार यांनी म्हटलं.
हेही वाचा : “परिवारावर आलात तर…”, भाजपाचा उद्धव ठाकरेंना इशारा, म्हणाले, “मातोश्री बंगल्यावर जाऊन…”
“विरोधकांना भीती वाटते की, २०२४ साली मोदी पुन्हा निवडून आले, तर आपल्याला निवडणुकीत लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही. पाटण्यात प्रत्येकजण २०२४ नंतर निवडणुका होणार नाही, हे सांगत होता. पण, संविधानानुसार निवडणुका होणार आहेत,” असेही मुनगंटीवार यांनी सांगितलं.