शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विद्यामान सरकारच्या अस्तित्वाबद्दल बोलताना आगामी काळात सत्ताबदल झाला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आमच्या संपर्कात काही आमदार आहेत, असे विधान केले. राऊतांच्या याच विधानावर आता भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात सत्तांतर कधीही होऊ शकते. मात्र हे सत्तांतर त्यांच्या नव्हे तर आमच्या बाजूने असेल असे मुनगंटीवार म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>“त्यांच्यावर बोलणे म्हणजे आपल्याच तोंडाची वाफ गमावणे” राऊतांच्या सत्तांतराच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांची टीका

“संजय राऊत सत्तांतर होईल असे म्हणत आहेत. राऊतांच्या म्हणण्यात तथ्य आहे. सत्तांतर कधीही होऊ शकते. मात्र हे सत्तांतर त्यांच्या नव्हे तर आमच्या बाजूने होईल. आघाडी सरकार लवकर जाईल, असे मी म्हणायचो. पण तेव्हा भाजपावाले जोतिषी आहेत काय, कुंडल्या घेऊन बसतात काय? असे हेच संजय राऊत म्हणायचे. मग आता राऊत जोतिषी झाले काय?” अशी खरमरीत टीका मुनगंटीवार यांनी केली. शिवसेना आता दोन तृतीयांश संपलेली आहे. उर्वरित लोकांना सांभाळून ठेवण्यासाठी संजय राऊत असे वक्तव्य करीत आहेत, असा दावाही मुनगंटीवार यांनी केला.

हेही वाचा >>> शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी, उद्धव ठाकरेंनी सर्वांसमोर केली घोषणा

त्यांच्यावर बोलणे म्हणजे….

राऊतांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “आमचीच सत्ता येईल असे म्हणणारे नेते खूप भाबडे आहेत. ते दिवसातून कितीतरी वेळा काय काय बोलतात. त्यांच्यावर बोलणे म्हणजे आपल्या तोंडाची वाफ दवडणे आहे. त्यामुळे कृपया त्याच्यावर मला विचारू नका. याबाबतचे प्रश्न विचारायचे असतील तर आमच्या छोट्या प्रवक्त्यांना विचारा. ३२ दिवस पाच लोकांचं ज्यांनी सरकार चालवलं त्यांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नाही,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना त्यांचे नाव न घेता लगावला. तसेच, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, आम्ही कोणतेही काम अटकू देणार नाही, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

हेही वाचा >>> विश्लेषण : धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळणार की उद्धव ठाकरेंना, जाणून घ्या शिवसेनेतील संघर्ष आणि निवडणूक आयोगाची भूमिका

संजय राऊत काय म्हणाले?

“सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने १६ आमदार अपात्र ठरतील हे नक्की आहे. बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं, पण यानंतर ते आपल्याला शिवसैनिक म्हणू शकणार नाहीत. दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. भविष्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar comment on fall of eknath shinde devendra fadnavis fall of government criticizes sanjay raut prd