राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. याच कारणामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. राज्यपालांनी राजीनामा द्यावा तसेच भाजपाने महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी उद्धव टाकरे गट तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून केली जात आहे. काँग्रेसने तर महाराष्ट्राची माफी न मागितल्यास तुम्हाला फिरू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच मुद्द्यावरून संताप व्यक्त केला जात असताना, भाजपाचे नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा दाखला दिला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा >>> “छत्रपतींनी जर माफी मागितली, तर मग पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात…”; संजय राऊतांचं विधान!
“छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालबाह्य हा शब्दच वापरला नाही. बाळासाहेब ठाकरे यांना काही लोक प्रतिशिवाजी म्हणायचे. याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे प्रतिशिवाजी होते का? याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. शरद पवार यांना जानता राजा म्हणायचे. आपण उदाहरण देताना प्रतिकात्मकता म्हणून ते वापरतो. दोन भावांमध्ये प्रेम असेल तर आपण त्यांना राम आणि लक्ष्मण आहेत, असे म्हणतो,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकत आहे
राज्यपाल कोश्यारी यांनी तसेच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. “भाजपाच्या प्रवक्त्याने शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली, असे विधान केले आहे. ही भाजपाची अधिकृत भूमिका आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच वेळा माफी कधी मागितली, हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले पाहिजे. मुख्यमंत्री आणि त्यांचे ४० लोक निषेधही करू शकले नाहीत. शिवाजी महाराज यांच्या अपमानानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता. शिवाजी महाराज यांना माफीवीर म्हणण्यात आले आहे. महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकत आहे,” असे ठाकरे गटातील नेते संजय राऊत म्हणाले आहेत.