सक्तवसुली संचालनालयाने मालमत्तेवर टाच आणल्यानंतर प्रथमच मुंबईत आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी विमानतळावर जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपावर हल्ला चढवला. आयएनएस विक्रांतच्या आणि राष्ट्रभक्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये गोळा करून पीएमसी बँकेच्या माध्यमातून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ते पैसे स्वत:कडे वळवले, असा आरोप राऊत यांनी गुरुवारी केला. शिवसैनिकांनी राऊत यांचे जंगी स्वागत केलं. मात्र याच जंगी स्वागतावरुन भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांची तुलना थेट पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेसोबत केलीय.
नक्की वाचा >> शिवसैनिकांनी केलेलं राऊतांचं जंगी स्वागत पाहून नारायण राणे संतापले; म्हणाले, “राऊतांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की…”
राऊत यांच्या स्वागताला शेकडो शिवसैनिक मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. संजय राऊत विमानतळावर दाखल होताच त्यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. विमानतळावर शिवसेनेचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवसैनिकांनी यावेळी ढोल ताशा वाजवत राऊतांचं स्वागत केलं. मात्र राऊत यांच्या या स्वागताची तुलना मुनगंटीवार यांनी पुण्यामध्ये येरवडा तुरुंगापासून काढण्यात आलेल्या गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसोबत केलीय. गजा मारणे या कुप्रसिद्ध गुंडाचीही अशीच मिरवणूक निघाली होती, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
तू गजा मारणेच हो सांगण्यासारखा प्रकार
मुनगंटीवार यांनी संजय राऊतांच्या या स्वागतासंदर्भात बोलताना, “पुण्यात गजानन मारणे नावाचा गुंड होता, तो सुटल्यानंतर त्याचं जंगी स्वागत झालं, म्हणजे तो काही आदर्श पुरुष आहे का? प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला सांगायाचं तू गजानन मारणेच हो, हे सांगण्यासारखं आहे,” असा टोला लगावलाय.
नक्की वाचा >> सोमय्यांना ‘येड**’, ‘चु**’ म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या शिवराळ भाषेबद्दल रोहित पवारांचं रोकठोक मत; म्हणाले, “शब्द..”
‘गजा मारणे आणि गमजा मारणे…’
मुंबई भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनीही ट्विटरवरुन राऊतांच्या स्वागताचा व्हिडीओ शेअर करत, ‘गजा मारणे आणि गमजा मारणे…’ अशी कॅप्शन दिलीय.
राऊत यांनी केलं या शक्तीप्रदर्शनाचं समर्थन
संजय राऊत यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाल्यावर शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन करत घोषणाबाजी केली. हे शक्तिप्रदर्शन नाही तर चीड आणि संताप आहे. आयएनएस विक्रांतच्या नावाने पैसा गोळा करून त्याचा घोटाळा झाला आहे. खुद्द राजभवननेच पैसे जमा झाले नसल्याची माहिती दिली आहे. त्याविरोधात आज शिवसैनिकांनी आंदोलन केले. हे शक्तिप्रदर्शन नाही तर लोकांच्या भावना आहेत, असं राऊत यांनी म्हटलं.
नक्की वाचा >> “…म्हणून ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढणारे येड** पहिल्यांदाच बघितले”; अपशब्द वापरत मनसे नेत्याचा राऊतांना टोला
भाजपावर निशाणा
भाजपाचे लोक आयएनएस विक्रांत घोटाळा करणाऱ्या किरीट सोमय्यांच्या बाजूने उभे आहेत. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. मी पुराव्यासह भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. राज्यसभेत हा विषय निघाल्यावर त्यांच्याच पक्षाचे खासदार यावर बोलू शकलेले नाहीत. कारण त्यांनाही माहिती आहे की घोटाळा झाला आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.
न
भाजपाविरोधात चीड असल्याचा दावा
केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल आज गावपातळीवर चीड आहे. भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ला करत आहे, असे संजय राऊत म्हणाले. तुम्ही आमचे काय करणार? केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपा आमच्यावर हल्ले करत आहे. ते फारतर आम्हाला तुरुंगात पाठवतील. माझी तयारी आहे. आम्हाला ठार मारतील, आमची तयारी आहे. पण २५ वर्षे तुमचे सरकार महाराष्ट्रात येणार नाही याची तजवीज तुम्हीच करून ठेवली आहे, असंही राऊत म्हणालेत.
ठिणगी पडलीय…
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सगळय़ांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हीही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. ठिणगी पडली आहे. यापुढे जसजशी त्यांची पावले पडतील, तशी आमची पावले पडतील असे राऊत म्हणाले.