“कॅबिनेटमध्ये एक निर्णय झाला. मोहाच्या देशी दारूला आता विदेशी दारू म्हणायचं. या सरकारकडे काहीही न करता त्याचे प्रमोशन करायची कला अवगत आहे. असं सरकार कुणालाही मुख्यमंत्री म्हणू शकतं. मात्र, सत्तेपेक्षा सत्यावर प्रेम करणारा मुख्यमंत्री जनतेला हवा आहे,” असं वक्तव्य भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना केलं.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानी देवीसमोर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, असं साकडं घातलं. त्यावर संजय राऊतांनी उद्धव ठाकरेच २५ वर्षे मुख्यमंत्री असतील असं म्हटलंय. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय. त्यात काही गैर नाही. आपल्या राज्यात ज्या पक्षाचे केवळ दोन आमदार आहेत त्यांनाही वाटतंय की आपण मुख्यमंत्री व्हावं.
“यासाठी काही देवाकडं साकडं घालतात. मात्र, ईश्वराचा अंश असलेल्या जनतेला कोण आवडतो यावर जनता मुख्यमंत्री ठरवत असते. काहींना वाटतंय राजभवनात जाऊन शपथ घेण्याची गरज नाही. ते एकमेकांना तुम्ही मुख्यमंत्री असे टोपणनावाने मिरवू शकतात,” असा टोला सुधीर मुनगंटीवर यांनी लगावला.
हेही वाचा : …तर गृहमंत्रीपद फेकून द्या; सुधीर मुंनगंटीवार यांचं दिलीप वळसे पाटलांना आवाहन
“खासदार सुप्रिया सुळे यांना वाटतयं की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा, तर संजय राऊतांना वाटतंय की २५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा. मात्र, भाजपाला असं वाटतयं की, जनतेची सेवा करणारा मुख्यमंत्री असावा,” असंही मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.