राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हेच प्रकरण उद्धव ठाकरे गटाने लावून धरले असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या निषेधार्थ सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. आज (२७ नोव्हेंबर) खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या याच आवाहनाचा पुनरुच्चार केला. राज्यपालांनी केलेल्या विधानाविरोधात लवकरच कठोर पावले उचलण्यात येतील. उद्धव ठाकरेंनी त्याबाबत अल्टिमेटम दिलेला आहे, असे विधान केले आहे. राऊतांच्या या विधानावर आता भाजपाचे नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. ते आज सकळी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> “तुम्हाला भाडेकरू हवाय की जावई?” बंगळुरूमध्ये घरमालकांचे अजब निकष, नेटिझन्समध्ये तुफान चर्चा!
“जोपर्यंत सूर्य, चंद्र, पृथ्वी आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. ते शूरवीर आणि जानते राजे आहेत.अल्टिमटेम कोणत्याही राजकीय पक्षाला देते येते. अल्टीमेटम देण्याचा कोणालाही अधिकार आहे,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
हेही वाचा >>>‘तर उठाव होणारच!’ राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करत संभाजीराजेंचा इशारा, म्हणाले “भावना समजत नसतील तर…”
नवी मुंबईत आसाम भवन आहे. महाराष्ट्रात सगळ्याच राज्यांना जागा हवी आहे. पण महाराष्ट्राला कोणी कधी जागा देणार का, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या या प्रश्नालादेखील मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. “आपल्याला तिरुपती मंदिराच्या ट्रस्टीमध्ये महाराष्ट्राला जागा मिळाली. उद्धव ठाकरे यांचे सचिव या मंदिराच्या ट्रस्टीमध्ये आहेत. आपल्याला दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे. आपण जागा मागितल्यास ती उपलब्ध होईल. मात्र आपण जागाच मागितली नसेल तर ती उपलब्ध होण्याचा प्रश्न नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे इतर राज्यांना मुंबईत जागा हवी असते. आपल्याला इतर राज्यांमध्ये कमी काम असते. मात्र आपल्या राज्यात इतर राज्यांना काम असते. यामुळे अनेक राज्ये मुंबईमध्ये जागा मागतात,” अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.