राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डबलगेम केला असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलं होतं. चार दिवस आधी शरद पवार मागे फिरले काँग्रेससह गेले त्यामुळे पुढचं काहीही जुळून आलं नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत हा दावा केलेला असतानाच आता सुधीर मुनगंटीवार यांनीही असाच एक दावा केला आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांना त्या गोष्टीची पूर्ण कल्पना होती आणि फडणवीस यांनी म्हटलं आहे ते योग्यच आहे असंही म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे सुधीर मुनगंटीवार यांनी?
“शरद पवारांनी आम्हाला धोका दिला यामध्ये तथ्य आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीची युती फायनल झाली होती. शरद पवार यांनी पालकमंत्री आणि जिल्हे यांचंही वाटप केलं होतं. मात्र ते माघारी फिरले. देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलं की शरद पवारांनी डबलगेम केला ते अगदीच योग्य आहे.” असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंवरही टीका
सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह आघाडी करतील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. आम्ही एकत्र लढलो होतो. पक्षाने मन मोठं केलं. त्यांना जागा दिल्या. पण तेव्हाही बेईमानी झाली. आम्ही आमच्या पक्षातून त्यांना उमेदवारही दिला होता. साताऱ्यातील भाजपाचा उमेदवार हा शिवसेनेचा म्हणून दिला होता. कुठल्याही राजकीय पक्षात असं घडत नाही पण आम्ही ते केलं होतं असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं?
पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवारांची ‘मिस्ट्री’ समजून घ्यायची असेल तर आधी त्यांची ‘हिस्टरी’ समजून घ्यायला हवी. तरच ही ‘मिस्ट्री’ कळेल. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, उद्धव ठाकरेंनी जेव्हा युती तोडून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आमचा फोनही घेणं बंद केलं. ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्याकडे काय पर्याय आहेत? याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की, एनसीपी भाजपाबरोबर येऊ शकते. ते स्थिर सरकार देऊ शकतात.”
“यानंतर आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत ठरलं की, महाराष्ट्रात भाजपा-एनसीपीचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल, याचा आराखडा तयार झाला. अजित पवार आणि मी दोघं या सरकारचं नेतृत्व करणार, हेही ठरलं. सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली,” असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला.