भाजपाकडून शिवसेनेला (शिंदे गट) सापत्न वागणूक मिळत असल्याचा दावा खासदार गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. “आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून, शिवसेना हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतला (एनडीए) घटक पक्ष आहे. एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत. आम्हाला घटकपक्षाला दर्जा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे. कीर्तिकर एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले की, लोकसभेला २२ जागांवर दावा करणार का? त्यावर कीर्तिकर म्हणाले, “दावा करण्याची गरज नाही. २२ जागा शिवसेनेच्या आहेतच.
दरम्यान, कीर्तिकरांच्या दाव्यावर आता भारतीय जनता पार्टीकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कीर्तिकरांच्या दाव्याबद्दल विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. या पक्षाचं नेतृत्व पूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे करायचे आता एकनाथ शिंदे या पक्षाचं नेतृत्व करत आहेत. युतीत एकनाथ शिंदे यांचा, शिवसेनेचा आणि त्यांच्या मागण्यांचा सन्मान होणार आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भारतीय जनता पार्टीला त्यांच्या २२ जागांचा दावा मान्य नाही असं तुम्हाला (माध्यमांना) कोणी बोललं नाही. असं काही वक्तव्य भाजपाच्या कुठल्याही नेत्याने केलं नाही. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे जागावाटपासारखे महत्त्वाचे प्रश्न असे टीव्हीवरच्या चर्चेने सुटत नाहीत. हा प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चेतून सुटेल.
हे ही वाचा >> “२०२४ मध्ये मोदींचं सरकार येईल आणि आपण…”, खासदार कुमार केतकरांनी काँग्रेसच्या लेट लतिफ नेत्यांचे कान टोचले
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जागावाटपावर भाजपाकडून कोणी काही बोललंय का, किंवा आमच्यापैकी ती मागणी कोणी नाकारली आहे का? विधानसभेच्या जागांचं वाटप असेल किंवा लोकसभेचा प्रश्न असेल आम्ही एकत्र आहोत, एकत्र विचार करतो, एकत्र बसून निर्णय घेतो. आमचं ध्येय हे खुर्ची, जागा, सत्ता यापेक्षाही मोठं आहे. जनतेचं हित हे आमचं ध्येय आहे. त्यामुळे जागेसाठी भाजपा दुराग्रह करणार नाही.