मागील अनेक वर्षांपासून एकाकीपणे लढा सुरु असलेल्या बेळगाव आणि कर्नाटकातील सीमावायिंसाठी शिंदे-फडणवीस सरकारने नुकतीच एक समिती नियुक्त केली आहे. हा निर्णय घेऊन काही तास होत नाही, त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. जत तालुक्यातील ४० गावं कर्नाटकात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत, असे संकेत बसवराज बोम्मई यांनी दिले. या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत.
याप्रकरणावर मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जत तालुक्यातील गावे कर्नाटकात जाण्यात इच्छुक असेल तरी प्रश्न सुटणार नाही. कारण, सर्वोच्च न्यायालय विचारेल की यांना कर्नाटकात जायचं आहे. तर, कर्नाटकातील शेकडो ग्रामपंचायतींना महाराष्ट्रात येण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयात योग्य समितीच्या माध्यमातून याचा निर्णय होईल. सरकार मदत करत नाही, असे कारणे सांगून कोण ठराव करत असेल तर हे आश्चर्यजनक आहे,” असेही मुनगंटीवार यांनी म्हटलं.
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकार टीका केली आहे. “राज्यात एक अत्यंत हतबल आणि कमजोर सरकार आहे. त्यामुळे कर्नाटकाचे मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातील ४० गावांवर दावा सांगण्यास धजावले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र हा नीट समजलेलाच नाही. ते अनेक वर्षे संबंधित खात्याचे मंत्री होते. तरी त्यांनी आजपर्यंत सीमावासियांच्या कोणत्या प्रश्नांना वाचा फोडली, याचे उत्तर मुख्यमंत्री शिंदेंनी द्यावे,” असे आव्हान संजय राऊतांनी दिलं आहे.