नरेंद्र मोदी यांनी रविवारी (९ जून रोजी) तिसऱ्यांना पतंप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी एनडीएच्या घटक पक्षांसह राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. मात्र, राज ठाकरे यांना या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊनही राज ठाकरेंना शपथविधीचं निमंत्रण का नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, आता भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांना राज ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण का नव्हतं? असा प्रश्न विचारण्यात आला, यासंदर्भात बोलताना घाईगडबडीने त्यांना निमंत्रण द्यायचं राहिलं असेल, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार?
“यासंदर्भात माझं बाळा नांदगावर यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की त्यांना या सोहळ्याचं निमंत्रण नव्हतं. मी नक्कीच वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा करेन. कदाचित घाईगडबडीत त्यांना निमंत्रण द्यायचं राहिलं असेल. मात्र, यामागे दुसरी कोणतीही भावना नाही”, असं सुधीर मुनंगटीवार म्हणाले. तसेच “शपथविधी सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांची यादी अधिकारी राजशिष्टाचारानुसार करतात, त्यामुळे कधी कधी जवळच्या व्यक्तींना निमंत्रण द्यायचं राहून जातं. मात्र, राज ठाकरे यांना निमंत्रण नसेल, तर त्याची नोंद केंद्रीय नेतृत्वाने घेतली पाहिजे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
मनसे नेते बाळा नांदगावर म्हणाले…
दरम्यान, यासंदर्भात मनसे नेते बाळा नांदगावर यांनीही भाष्य केलं. “राज ठाकरेंना मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण होतं की नव्हतं याबाबत राज ठाकरेच स्पषपणे सांगू शकतील. मात्र, हे खरं आहे की मला सुधीर मुनगंटीवार यांचा फोन आला होता. माझं त्यांच्याशी बोलणं झालं. मी त्यांना जे सांगायचं ते सांगितले. मात्र, यासंदर्भात राज ठाकरे यांचे परस्पर काही बोलणं झाले असेल, तर याची मला कल्पना नाही”, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावर यांनी दिली.
हेही वाचा – Raj Thackeray : लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपाच्या ‘या’ दिग्गज नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट!
रविवारी नरेंद्र मोदींसह ७२ मंत्र्यांनी घेतली होती शपथ
लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर रविवारी (९ जून) नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा शपथविधी सोहळा पार पडला होता. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली होती.
या शपथविधी सोहळ्याला देशभरातली मान्यवरांसह परदेशातील प्रमुख पाहुणेदेखील उपस्थित होते. याशिवाय एनडीएतील घटक पक्षांससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही यावेळी निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंना या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रित नव्हतं. त्यामुळे मनसेच्या काही नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.