ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यपदावरून निवृत्त होणार असल्याचं आज ( २ मे ) जाहीर केलं. शरद पवारांच्या घोषणेनंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी हा निर्णय घेतला. या निर्णयानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही यावर भाष्य केलं आहे.
“शरद पवारांनी संसदीय कामकाजात सहभागी होणार नाही, अशी स्पष्टता दिली आहे. शरद पवारांनी ‘राष्ट्रवादी पक्षाचा कारभार ज्येष्ठ नेत्याच्या हातात एक समिती नेमून सोपवण्याचा विचार करतोय,’ असं सांगितलं. त्यामुळे शरद पवार निवृत्त घेतील का? याचा अर्थबोध आज होत नाही. कदाचित तीन वर्षानीही ते निवृत्ती घेऊ शकतात,” असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
हेही वाचा : “गेली ६० वर्षे…”, शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यावर जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर; म्हणाले…
“शरद पवारांना भविष्यात काय होईल, हे लवकर लक्षात येतं. त्यामुळे शरद पवार आत्ता निवृत्त होत आहेत, याचा अर्थ २०२४ साली महाविकास आघाडीचं सरकार येऊच शकत नाही, हा अर्थबोध त्यांनी घेतला असावा. योग्यक्षणी निवृत्त झालो, तर २०२४ साली होणाऱ्या पराभवाचं अपश्रेय आपल्या वाट्याला येऊ नये, असं त्यांना वाटतं,” असेही सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं.
शरद पवार काय म्हणाले?
“प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.
हेही वाचा : “सुप्रिया, तू बोलू नको, मोठा भाऊ म्हणून सांगतोय”, अजित पवारांनी रोखलं; नेमकं काय घडलं?
“रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत…”
“गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले, हे मी विसरू शकत नाही. पण, यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी असे मी सुचवू इच्छितो,” असं शरद पवार म्हणाले.