भाजपा नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनंख आणण्याबाबत करार करण्यासाठी लंडनला गेले होते. ते वाघनखं न घेताच परत आले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्या दौऱ्यावर बच्चू कडू यांनी उपाहासात्मक टीका केली आहे. करार करण्यासाठी लंडनला जाण्याची गरज नव्हती. हे काम ऑनलाईनही झालं असतं. लंडन दौऱ्यासाठी ५० ते ६० लाखांचा खर्च करण्याची गरज नव्हती, अशा आशयाची टीका बच्चू कडूंनी केली. बच्चू कडूंच्या टीकेला आता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एक व्हिडीओ जारी करत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “बच्चू कडू यांनी असं उपाहासात्मक बोलण्याची आवश्यकता नव्हती. उद्या ते आमदारकीच्या निवडणुकाही घेऊ नका, असं म्हणतील. कारण आमदारकीच्या निवडणुकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. एका लोकसभेच्या निवडणुकीला २५ कोटींचा खर्च होतो. त्यामुळे २० वर्षांतून एकदा निवडणुका घ्या, अशी सूचना त्यांनी केली नाही, हे बरं झालं.”
हेही वाचा- “…पण गिरीश महाजनांना नेहमी मोठी खाती मिळतात”, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य चर्चेत
“खरं तर, अशाप्रकारे ऑनलाईन एमओयू करता येत नाही, हे कदाचित त्यांना माहीत नसेल. अनेकदा आमदार विधीमंडळात निवडून येतात, पण माहितीच्या अभावी ते अशापद्धतीने प्रतिक्रिया देत असतात,” असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.
हेही वाचा- “साहेब, दादा आणि ताईसाहेब हे सगळं फेकून द्या”, गोपीचंद पडळकरांची सडकून टीका
सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, “बच्चू कडूंकडून ही अपेक्षा नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक आस्था असणाऱ्या वाघनखांच्या बाबतीत त्यांनी असं भाष्य केलं असेल तर ते योग्य नाही. शेवटी त्यांनाही लाखो रुपयांचा पगार जनतेनं कराच्या रुपात भरलेल्या पैशातून दिला जातो. तो पगार घेताना त्यांना असं काही वाटलं नाही. उद्या अधिवेशन ऑनलाईन घेतलं तर करोडो रुपये वाचतील, अशी सूचना त्यांची कदाचित असू शकते. कारण अधिवेशनात एका मिनिटाला ७० हजार रुपये खर्च होतात.”
हेही वाचा- “…आता मुनगंटीवारांना खाजवायलाही नखं राहिली नाहीत”, वाघनखांवरून बच्चू कडूंची टोलेबाजी
बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
“सुधीरभाऊ, वाघनखं आणायला गेले होते. त्यांनी वाघनखं तर आणलीच नाहीत. पण आता त्यांना खाजवायलाही नखं राहिली नाहीत”, असा टोला बच्चू कडूंनी एका कार्यक्रमात लगावला होता. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, “सुधीर मुनगंटीवार हे वाघनखं न घेताच परत येत आहेत. ते ५०-६० लाख रुपये खर्च करून तिथे गेले. हे काम फोनवरूनही करता आलं असतं. मोदीजी डिलीटल इंडिया म्हणतात आणि आमचे मंत्री तिथे व्यक्तीश: जातात आणि मोकळ्या हाताने परत येतात. सुधीरभाऊंनी असं करावं, हे चुकीचं आहे. ते मोठे देशभक्त मंत्री आहेत.”