Kunal Kamra Controversy: कुणाल कामराने एका स्टँड-अप शो दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. ‘दिल तो पागल है’ मधील एका गाण्याचे विनोदी विडंबन करून केलेली ही टिप्पणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याच्याबाबत प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. या शो दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी स्टँड-अप कॉमेडियनविरुद्ध एफआयआर देखील नोंदवला आहे.
त्याच्या आयुष्याची कॉमेडी करा
अशात आता भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिसांनी कॉमेडियन कुणाल कामराच्या आयुष्याची कॉमेडी करावी, असे विधान केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोतलाना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “पोलिसांनी त्याला पकडावे आणि त्याच्या आयुष्याची कॉमेडी करावी. भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही काहीही बोलू शकत नाही. प्रत्येकाला स्वाभिमानाचा अधिकार आहे. केतकी चितळेने कोणाचे नावही घेतले नव्हते तरी तिला ३० दिवस तुरुंगात ठेवले. त्यामुळे विरोधकांना आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही.”
काय आहे प्रकरण?
आपल्या शोमध्ये कुणाल कामराने राज्यातील राजकीय राजकीय परिस्थितीवर टीका केली होती. यावेळी त्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीचा संदर्भही दिला होता.
कुणाल कामरा शोमध्ये म्हणाला, “महाराष्ट्र निवडणुकीत त्यांनी काय केले आहे, त्यांना सांगावे लागेल. आधी शिवसेना भाजपमधून बाहेर पडली, नंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीतून बाहेर पडली.”
याचबरोबर कुणालने या शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक व्यंगात्मक गाणेही सादर केले होते. यानंतर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील कार्यक्रमस्थळाच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच त्याच्याविरोधा तक्रारही दाखल केली होती.
शिवसेना आक्रमक
यापूर्वी कुणाल कामरा प्रकरणावर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना उदय सामंत म्हणाले होते की, “कुणाल कामराने सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर अपमानास्पद टिप्पण्ण्या केल्या आहेत. हे कोणत्याही राज्यासाठी किंवा देशासाठी चांगले नाही. त्याला वाटते की तो खूप ज्ञानी आहे, पण ते तसे नाही. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे पण बोलताना आपण काय बोलतो याचा विचार करावा. जर त्याला एकनाथ शिंदेंबद्दल काही बोलायचे असेल तर त्याने मुंबई, रत्नागिरी किंवा कोल्हापूरला यावे. तो पाँडिचेरीमध्ये का लपला आहे?”