महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपावार टीका केली. तसेच नाशिक शहराचा विकास जेव्हा महापालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती तेव्हा झाला असा दावा केला. आता नाशिक महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्षपणे टोला लगावल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, यावर आता भारतीय जनता पार्टीकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले राज ठाकरे यांनी नाशिकचा विकास केलाय तर फडणवीसांसाठी काही शिल्लकच राहिलेलं नाही. ते म्हणतायत विकास केला तर फडणवीसांसाठी त्यांनी काही शिल्लकच ठेवलेलं नाही.
दरम्यान, राज ठाकरे यांनी नुकतंच वक्तव्य केलं होतं की, भाजपाने लोकांच्या बोलण्यावर आणि लिहिण्यावर बंदी घातली आहे. यावर देखील मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, दुसऱ्याच्या बोलण्यावर अथवा लिहिण्यावर भाजपाने बंदी घातली नाही. परंतु राज ठाकरे यांनी दुसऱ्यांच्या मुंबईत येऊन फिरण्यावर आणि पाट्या लावण्यावर बंदी घातली होती.
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढून टाकली आहे, त्यावरदेखील राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिला. राज ठाकरे यांनी मोदी सरकारच्या निश्चलनीकरणाच्या धोरणाला धरसोड करण्याचा प्रकार म्हटलं आहे. तसेच नव्या नोटा आणल्या तेव्हा त्या मशीनमध्ये जातात की नाही हेही बघितलं नसल्याचं सांगत टीका केली.
हे ही वाचा >> “घुसमट होत असेल तर पंकजाताईंनी…”, परळीतून संजय राऊतांचा पंकजा मुंडेंना सल्ला
राज ठाकरे म्हणाले, “हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात. आता पुन्हा लोकांनी बँकेत पैसे टाकायचे. पुन्हा हे नव्या नोटा आणणार. हे असं सरकार चालत नाही. असे प्रयोग केले जात नाहीत.”