राज्यातील अनेक पक्ष हे महायुतीत किंवा महाविकास आघाडीत आहेत. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखे काही पक्ष आहेत जे कोणत्याही युती किंवा आघाडीत सहभागी झालेले नाहीत. एखाद-दुसरी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक वगळता मनसे अद्याप स्वबळावर निवडणुका लढवत आली आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी मनसे आणि भाजपाची युती होईल, अशी चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन-तीन वेळा राज ठाकरेंची भेट घेतली. पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राज ठाकरे यांना भेटले. त्यामुळे मनसे-भाजपा युतीच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
दरम्यान, आता महायुतीतल्या पक्षांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारकडे बहुमतही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महायुतीत प्रवेश केल्यामुळे महायुती अजून मजबूत बनली आहे. त्यामुळे मनसेच्या महायुतीतल्या प्रवेशाच्या चर्चा आता मावळल्या आहेत. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही वेळापूर्वी भाजपाबरोबरच्या युतीबाबतच्या प्रश्नावर स्पष्ट उत्तर दिलं.
काही वेळापूर्वी राज ठाकरे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी राज ठाकरे यांना भाजपा नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच्या भेटींवरून मनसेच्या महायुतीतल्या प्रवेशाबाबत प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, इथे भाजपाबरोबर जाण्याचा प्रश्न नाही, कोणीही कोणालाही भेटलं की युत्या होत नसतात. दोन नेते भेटले म्हणजे लगेच युती झाली का? तो तुम्हा प्रसारमाध्यमांच्या रोजच्या बुलेटिनचा भाग असेल, त्याचा आमच्याशी काहीच संबंध नसतो.
हे ही वाचा >> “अमित महाराष्ट्रभर टोलनाके…”, तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आता भारतीय जनता पार्टीकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यावर म्हणाले, ठीक आहे मग! तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत का? ते येणार नाहीत याचा आनंद आहे. आयुष्यभर त्यांनी महायुतीत येऊ नये अशी सदिच्छासुद्धा आहे.