गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची सत्ताप्राप्तीनंतर ‘गोची’ करताना पक्षात नव्याने आलेल्या ‘उपऱ्यां’ना संधी मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या. त्यानंतर आता जिल्ह्याचे संपर्कमंत्री सुधीर मुनगंटीवार जुन्या-नव्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून विविध समित्यांवरील नावे अंतिम करणार आहेत.
पंधरा वर्षांच्या सत्तासंघर्षांनंतर भाजप कार्यकर्त्यांसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत. केंद्रापाठोपाठ राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पण निवडणुकीपूर्वी व नंतर अन्य पक्षातून येणाऱ्यांची संख्या वाढली. त्यातच अनेकांनी आपापले राजकीय वजन खर्ची करून विविध समित्यांवर वर्णी लावण्याचा प्रयत्न सुरू केला. देगलूर-बिलोली मतदारसंघात पक्षाच्या एका नव्या नेत्याच्या शिफारशीनुसार तालुकास्तरीय समितीवर एक-दोघांची नियुक्ती झाली. परंतु ही नियुक्ती करताना जिल्हा व महानगर अध्यक्षांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही.
उपऱ्यांना संधी मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी मुंबईत भाजपच्या एका निष्ठावंत शिष्टमंडळाने संपर्कमंत्री मुनगंटीवार यांची भेट घेतली. काहींनी हा विषय थेट मुख्यमंत्र्यांच्या कानी घातला. निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर आता मुनगंटीवार यांनी नांदेड येथे बठक घेण्याचे मान्य केले आहे. जुने-नवे कार्यकत्रे, नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून एकमताने विविध शासकीय समित्यांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे मुनगंटीवार यांच्या अधिकृत पत्राशिवाय कोणाचीही नियुक्ती केली जाऊ नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
मुंबईला गेलेले पक्षाचे काही पदाधिकारी बुधवारी नांदेडात परतले. आम्ही आमच्या भावना वरिष्ठांच्या कानी घातल्या. निष्ठावंतांना न्याय मिळेल, अशा शब्दांत आम्हाला आश्वस्त करण्यात आल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत गेलेल्या शिष्टमंडळातील एका गटाने महानगर अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तक्रारीचा सूर आळवला. सत्ताप्राप्तीनंतर पक्ष संघटन वाढवणे, जुन्या कार्यकर्त्यांना न्याय देणे आवश्यक असताना काही मंडळी केवळ अन्य पक्षातल्या कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यालाच महत्त्व देत असल्याची बाब संपर्कमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

Story img Loader