सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचे भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी असेल असं स्पष्ट केलंय. या सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार हे राज्यामधील एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सरकारचा उल्लेख पत्रकाराने ‘शिंदे-भाजपा सरकार’ असा केल्याने संतापल्याचं पहायला मिळालं. मुनगंटीवार यांनी राज्यातील सरकार हे शिवसेना-भाजपा सरकार असल्याचं सांगतानाच घराणेशाहीवरुन ठाकरे कुटुंबावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

नक्की पाहा >> Photos: “उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या आदेशानेच पवारांवर पातळी सोडून टीका”; बापाचा उल्लेख करत अजित पवारांनी इशारा दिलेल्या नेत्याचा गौप्यस्फोट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“१ ऑगस्ट तारीख दिली आहे न्यायालयाने तर टांगती तलवार आहे असं म्हणता येईल?” असा प्रश्न मुनगंटीवार यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, “नाही, याचा टांगती तलवारशी काहीही संबंध नाहीय. सरकारच्या स्थिरतेशी, अस्थिरतेशी काहीही संबंध नाहीय,” असं स्पष्ट केलं. पुढे बोलताना मुनगंटीवार यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. “काही लोक स्वत:च्या मनामध्ये असा भाव निर्माण करुन आनंद घेत आहेत. ती त्यांची सवय झालीय,” असं आजच्या सुनावणीसंदर्भात बोलताना मुनगंटीवार म्हणाले.

नक्की वाचा >> सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १ ऑगस्टला : राज्यात पुढील ११ दिवस दोघांचेच सरकार? मंत्रिमंडळाचा विस्तार, अधिवेशनबाबत अनिश्चितता

“कोणताही आमदार फुटलाच नाही. ते शिवसेनाच आहेत. खरी शिवसेना आमची आहे असं ते सांगतायत. आमच्याकडे बहुमत असल्याने खरी शिवसेना आमची आहे असं ते म्हणतातय. त्यांनी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलेला नाहीय. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना भाजपाने पाठिंबा दिलाय,” असं मुनगंटीवार यांनी बंडखोर आमदार हे शिवसेनेचाच भाग असल्याचा युक्तीवाद करताना म्हटलं. त्याचप्रमाणे पुढे बोलताना मुनगंटीवार यांनी, “आता निवडणूक आयोगाला एक ठरवावं लागेल की शिवसेना कार्यकर्त्यांच्या हक्काची आहे की शिवसेना व्यक्तीगत मालकीची आहे,” असंही ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना म्हणाले.

नक्की वाचा >> “जसं काही त्यांचं…”; नातवाचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंना टोला

“शिंदे-भाजपा सरकारची पुढील भूमिका काय असणार आहे?” असा पुढचा प्रश्न पत्रकाराने विचारला असताना मुनगंटीवार पत्रकारावर चिडल्याचं दिसून आलं. त्यांनी या सरकारला ‘शिंदे-भाजपा सरकार’ म्हणण्यावर आक्षेप घेतला. “तुम्ही शिंदे-भाजपा सरकार म्हणून नका शिवसेना-भाजपा सरकार म्हणा,” असं त्यांनी पत्रकाराला सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी, “हा अन्याय आहे लोकशाहीवरचा! लोकशाहीमध्ये ज्यांचं बहुमत असतं त्यांचा पक्ष असतो. पक्ष कार्यकर्त्यांचा आहे की एका व्यक्तीच्या मालकीचा आहे? घराणेशाही, वंशवाद, परिवारवाद हा कधीतरी संपवावा लागेल,” असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेमध्ये सुरु असणाऱ्या वादावरुन ठाकरे कुटुंबाला लगावला.

नक्की वाचा >> “…त्या दिवशी भाजपा बंडखोरांना बाजूला करेल”; शिंदे गटासंदर्भात उद्धव ठाकरेंचं भाकित

“मी, माझं कुटुंब आणि माझी मित्रमंडळी असं सूत्र कसं लावता येईल? इथं आम्ही ‘राष्ट्र प्रथम मग पक्ष आणि त्यानंतर मी’ म्हणतो. या उलट काही पक्षांमध्ये प्रथम मी मग माझं कुटुंब आणि मग माझी मित्रमंडळी. असं असेल तर जनता कुठं गेली?” असा प्रत्यक्षपणे भाजपा आणि उद्धव ठाकरे गटाची तुलना करताना मुनगंटीवार यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> “घोटाळे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि…”; ‘फाईल्स उघडल्याने गद्दारी केली’ म्हणत आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर टीका

“शिवसेना-भाजपा सरकारचं उद्दीष्ट जे आहे ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा अंत्योदय आणि बाळासाहेब ठाकरेंचं ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे धोरण आहे,” असंही ते शेवटी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar slams reporter for sayin shinde bjp government and not shivena bjp govt scsg