Sudhir Mungantiwar : भाजपाला आणि महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं. भाजपाला १३२ जागा मिळाल्या तर महायुतीला २३७ जागांवर यश मिळालं. महाराष्ट्रात महायुतीला मिळालेलं हे सर्वाधिक बहुमत आहे. लोकांनी अभूतपूर्व विश्वास दाखवल्याने आमची जबाबदारी वाढली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. तसंच जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार झाला तेव्हा काही दिग्गजांना नाकारलं गेलं. सुधीर मुनगंटीवार हे असंच एक नाव ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. लोकसभेला हरल्याने सुधीर मुनगंटीवार यांना नाकारण्यात आलं का? की आणखी नेमकं काय झालं? याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
पहिल्यांदा पराभव झाल्यानंतर राजकारण सोडण्याचा विचार केला. पण प्रमोद महाजनांमुळे पुन्हा सक्रिय झाल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते म्हणाले की, “प्रमोद महाजनांनी १९८९ मध्ये पराभव झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी विनोबा भावेंचा दाखला देत राजकारण सोडण्याचा विचार बोलून दाखवला. हजारो गोड पाण्याच्या नद्या समुद्राला मिळतात, पण समुद्र गोड होत नाही. पण तरीही नद्या वाहायच्या थांबत नाहीत. समुद्राच्या पाण्याचे बाष्पिभवन होऊन गोड पाणी मिळतं असं प्रमोद महाजन म्हणाले. त्यानंतर मी पुन्हा राजकारणात सक्रिय झालो.” अशी आठवण सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितली.
हे पण वाचा- BJP MLA : “मी लायक वाटलो नसेन…” मंत्रिपद न मिळाल्याने भाजपा आमदाराची खदखद
पालकमंत्रिपदाबाबत काय म्हणाले मुनगंटीवार?
गडचिरोलीचे पालकमंत्रिपद देवेंद्र फडणवीस घेणार अशी चर्चा आहे. त्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आजपर्यंत मुख्यमंत्री हे एका जिल्ह्याचे पालकमंत्री झाले नाहीत. मुख्यमंत्री हे संपूर्ण राज्याचे पालकमंत्री असतात. बीडच्या पालकमंत्रिपदावरही त्यांनी वक्तव्य केलं. मी स्वतःच मंत्री नसल्याने बीडच्या पालकमंत्रिपदावर कसं काय बोलणार असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी केला. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. त्यानंतर माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
सुधीर मुनगंटीवार मंत्रिपदाबाबत काय म्हणाले?
“मला मंत्रिपद का मिळालं नाही याची निश्चित माहिती नाही. पण ज्याला कुणाला माझं मंत्रिपद काढून घेण्यात आनंद वाटला त्याला नंतर खंत वाटेल असं काम करण्यासाठी मी मेहनत घेणार असा विश्वास भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. पक्षाचा मूळ विचार कायम ठेवण्यासाठी काही जणांना बलिदान द्यावं लागतं. मलाही तेच करावं लागलं. पण सत्तेचं संगमरवरी स्मारक बांधताना मूळ विचारांची कबर विसरू नये,” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा अंगुलीनिर्देश कुणाकडे आहे? या चर्चाही सुरु झाल्या आहेत.