मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून सुधीर साळवींची शिवसेना ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.
सुधीर साळवींना देण्यात आलं सचिवपद
सुधीर साळवी यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने सचिवपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांना लालबागचा राजा पावला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे प्रवक्ते आणि काही पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर आता सुधीर साळवी यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.. आगामी मुंबई महानगरपालिकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो आहे.
सुधीर साळवी यांच्याकडे मोक्याच्या वेळी महत्त्वाचं पद
लालबाग परिसर हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे सुधीर साळवी यांच्याकडे मोक्याच्या क्षणी पक्षाचे सचिवपद देऊन उद्धव ठाकरे यांनी उत्तम राजकीय खेळी केल्याची चर्चाही होते आहे. यापूर्वी सुधीर साळवी यांनी विधानसभा निवडणुकीवेळी शिवडी विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र त्यांना माघार घ्यावी लागली होती. ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळामुळे सुधीर साळवी यांच्याभोवती एक वलय निर्माण झाले आहे. गणपतीच्या काळात अनेक बडे नेते आणि सेलिब्रिटी हे लालबागच्या दर्शनाला येतात. यावेळी सुधीर साळवी सर्वांबरोबरच दिसतात. विधानसभा निवडणुकीत सुधीर साळवी हे शिवडीतून लढण्यासाठी इच्छूक असताना उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार अजय चौधरी यांच्या पारड्यात दान टाकले होते. त्यावेळी सुधीर साळवी यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. आता सुधीर साळवी हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले होते. याच निष्ठेचे फळ आता सुधीर साळवी यांना सचिवपदाच्या रुपाने मिळाल्याची चर्चा आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाच्या पत्रकात काय म्हटलं आहे?
माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सचिवपदी सुधीर साळवी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. सुधीर साळवी हे लालबागचा राजा सार्वजनिक मंडळात गेल्या ३५ वर्षांपासून कार्यकारिणीत आहेत. २० वर्षांपासून सातत्याने मंडळाचे मानद सचिव म्हणून ते यशस्वी नेतृत्व करत आहेत. तसंच त्यांचं शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातलं योगदान मोठं आहे असं पत्रकात म्हटलं गेलं आहे.
सुधीर साळवी हे सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेले २० वर्षे मानद सचिव आहेत. तसेच महर्षी दयानंद महाविद्यालय आणि ग्लेनईगल्स हॅास्पिटलचे विश्वस्त म्हणून देखील सुधीर साळवी कार्यरत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सुधीर साळवी यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक काही तासांपूर्वी जारी करण्यात आलं आहे.