माथेरान राज्यातील नव्हे तर देशातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे माथेरानच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दिली आहे. ते माथेरान नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.
या कार्यक्रमाला कर्जतचे आमदार सुरेश लाड, नगराध्यक्ष अजय सावंत, उपनगराध्यक्षा प्रतिभा घावरे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर तसेच नगरसेवकदेखील उपस्थित होते. दोन दिवसांच्या दौऱ्यांत तटकरे यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. माथेरानच्या प्रवेशद्वारी कोल्ड इमल्शन पद्धतीने बनवलेल्या रस्त्यांचे उद्घाटन त्यांनी केले. माथेरानमधील रस्त्यांची सातत्याने होणारी धूप हा चिंतेची बाब होती, त्यामुळे क्ले टाइल्सच्या माध्यमातून रस्ते बनवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. माथेरानच्या मॉनिटरिंग कमिटीने या रस्त्यांना मंजुरी दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन ठिकाणी या रस्त्यांची कामे केली जाणार आहे. या रस्त्याच्या भूमिपूजन तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. घोडय़ाच्या तबेल्याचे भूमिपूजन आणि बायोगॅस प्रकल्पाच्या माध्यमातून वीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
माथेरानच्या विकासासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी प्राधान्य दिल्याचे तटकरे यांनी सांगितले. तर कोकण विकास योजनेंर्तगत शहराच्या विकासासाठी ५ कोटींची निधी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. माथेरान शहरातील पाणी योजना असो अथवा भूमिगत वीज वाहिन्यांचे काम असो, यासाठी निधी प्राप्त झाला आहे. शटल सेवा आणि मिनीबस सेवेलाही सहकार्य मिळाले आहे. माथेरान हे देशातील प्रमुख पर्यटनस्थळ असून त्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader