एफआरपीची मोडतोड केलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना १५ टक्के व्याजासहित रक्कम द्यावी लागेल, असा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. आयुक्त गायकवाड यांनी याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पुण्यात शुक्रवारी (१७ डिसेंबर) आश्वस्त केले.

चालू गळीत हंगामात कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एफआरपी एकरकमी न देता त्याचे तुकडे केलेले आहेत. इथेनॉल निर्मितीमुळे अनेक साखर कारखान्यांची साखर उतारा कमी झाला आहे. याचा परिणाम उसाच्या एफआरपीवर झाला आहे. यासंदर्भात शेट्टी यांनी आज पुणे येथे साखर आयुक्त गायकवाड यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या. एफआरपीची मोडतोड करणाऱ्या कारखान्यावर महसुली जप्तीची (आरआरसी) कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

हेही वाचा : काळ्या यादीतील साखर कारखान्यांमध्ये सुभाष देशमुख, पंकजा मुंडेंचा कारखाना; शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा ठपका

राजू शेट्टी यांच्या मागणीवर साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, “एफआरपीची तुकडे केलेल्या कारखान्यांना १५ टक्के व्याजासहित उर्वरीत एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना द्यावीच लागेल. संबधित र्व शेतकर्‍यांनी तक्रारी केल्यास त्यांचे पैसे व्याजासहित वसूल करून देऊ.”