सांगली : कोयनेतून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची संधी साधून साखर कारखान्यातून सोडलेल्या मळी मिश्रित पाण्याने आमणापूर परिसरात हजारो माशांबरोबरच पाणसर्पांचाही मृत्यू होत आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदीकाठच्या कारखान्याची तपासणी केली असता सातारा जिल्ह्यातील कारखान्यातून दूषित पाणी प्रवाहित करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दूषित पाण्यामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडण्याचे प्रकार वारंवार घडत असून आता पाण्यात वावरणारे सर्पही मरून पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून येत आहे. पाणसर्पांचे मुख्य अन्न पाण्यातील लहान मासे हे असून विषयुक्त पाण्याने मृत झालेले मासे पोटात गेल्याने दिवड जातीचा हा पाणसर्प मृत्युमुखी पडल्याची घटना आमणापूर येथे उजेडात आली आहे.

तर कृष्णा नदीत मळीमिश्रीत पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगत असताना ते खाण्यासाठी कावळ्यांचीही धडपड पाहायला मिळत आहे. गेले दोन -तीन दिवस कारखान्याच्या मळीचा वास येत आहे. तसेच नदीचे पाणीही काळपट दिसत आहे. अशातच या मळीमिश्रीत पाण्यामुळे रविवारी सायंकाळपासून मृत मासे तरंगताना पाहायला मिळत आहेत. अशातच मृत साप पाण्यावर तरंगताना पाहायला मिळाल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले असल्याचे पर्यावरणप्रेमी संदीप नाझरे यांनी सांगितले.

दरम्यान, याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांच्याशी संपर्क साधला असता सांगलीतील आमणापूर परिसरात दूषित, दुर्गंधीयुक्त पाणी दिसून येत असून या पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. या दूषित पाण्याचा मूळ स्रोत शोधण्यासाठी हुतात्मा आणि राजारामबापू कारखान्याची पाहणी केली असता तेथून दूषित पाण्याचा निचरा केला जात नसल्याचे आढळून आले. मात्र, वरील बाजूस पाहणी केली असता सातारा जिल्ह्यातील कारखान्यातून हे दूषित पाणी नदीत सोडले जात असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. पाण्याचे नमुने आणि याची माहिती सातारा प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आली आहे.

कृष्णा नदीत वारंवार मासे आणि अन्य जलचर मृत्युमुखी पडण्याच्या घटना उगड होत असल्याने या नदी पात्राची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी करण्यात आली. या पाहणीत नदीकाठचे अनेक साखर कारखाने कोयना धरणातून नदीत विसर्ग करतेवेळी कारखान्याचे दुषीत पाणी, मळी सोडत असल्याचे प्राथमिक तपासणीत लक्षात आले आहे. या दूषित पाण्याचे नमुने घेतले असून याची माहिती मंडळाला कळवली आहे. विद्यासागर किल्लेदार, अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

Story img Loader