राज्यातील साखर उत्पादनात अजूनही सहकारी साखर कारखान्यांचा वाटा मोठा असला तरी खाजगी कारखान्यांनी देखील घोडदौड सुरू ठेवली असून चालू गाळप हंगामात आतापर्यंत खाजगी कारखान्यांनी २ कोटी ११ लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत उत्पादन तीस टक्क्यांनी वाढले आहे.यंदाच्या हंगामात राज्यातील एकूण १७७ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला, त्यात ९९ सहकारी आणि ७८ खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता ५ लाख ५९ हजार मे.टन ऊस गाळपाची आहे. आतापर्यंत ५ कोटी ३६ लाख मे.टन ऊसाचे गाळप झाले असून ५ कोटी ८२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी उतारा १०.८० टक्के आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात खाजगी कारखान्यांची संख्या वाढली आहे. २००६-०७ मध्ये हंगाम सुरू करणाऱ्या एकूण १६३ साखर कारखान्यांपैकी सहकारी कारखान्यांची संख्या १४१ होती, तर केवळ २२ खाजगी कारखाने अस्तित्वात होते. २०१०-११ पर्यंत ही संख्या ४१ वर आणि आता ७८ वर पोहचली आहे. साहजिकच खाजगी कारखान्यांची गाळप क्षमता देखील वाढली आहे. दुसरीकडे सहकारी कारखान्यांची संख्या घटत चालली आहे.गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यात ९४ सहकारी आणि ६१ खाजगी कारखाने सुरू होते. खाजगी कारखान्यांनी १ कोटी ३८ लाख मे.टन ऊसाचे गाळप करून १ कोटी ४६ लाख क्विंटल साखर तयार केली होती. सहकारी कारखान्यांनी ३ कोटी ११ लाख मे.टन ऊस गाळप करून ३ कोटी ४७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पंचवीस ते तीस टक्क्यांची ही वाढ आहे. यात खाजगी कारखान्यांचा वाटा झपाटय़ाने वाढत चालला आहे. हंगामाच्या अखेरीस खाजगी कारखाने आतापर्यंतचे विक्रमी उत्पादन घेतील, असे संकेत आहेत.साखरेच्या उत्पादनात पुणे विभाग राज्यात अग्रेसर असून या विभागातील एकूण ५९ कारखान्यांनी २ कोटी २३ लाख क्विंटल साखर तयार केली आहे. यात खाजगी कारखान्यांचा वाटा हा ८७ लाख क्विंटलचा आहे. सर्वात मागे नागपूर विभाग असून एकूण ४ कारखान्यांनी केवळ ३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. आतापर्यंत साखरेच्या उताऱ्याच्या बाबतीत मात्र सहकारी साखर कारखान्यांनीच आघाडी घेतली आहे. सहकारी कारखान्यांचा उतारा हा ११.६ टक्के तर खाजगी कारखान्यांचा उतारा हा १०.५८ टक्के आहे. १९९३ मध्ये राज्यात केवळ ३ खाजगी कारखाने अस्तित्वात होते. गेल्या दोन दशकांमध्ये सहकारी कारखाने बंद पडत गेले. असे सहकारी कारखाने खाजगी उद्योजकांना विकण्याच्या सरकारी धोरणाचा फायदा अनेक साखर सम्राटांनी उचलला आणि खाजगी कारखान्यांची संख्या वाढत गेली. विदर्भात तर वीस कारखाने उभारले गेले होते. पण आता केवळ सहा कारखाने चालू स्थितीत आहेत, त्यात एकच सहकारी कारखाना आहे. साखर उत्पादनातही या कारखान्यांनी सहकारी कारखान्यांशी स्पर्धा चालवली आहे.
-मोहन अटाळकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा