विदर्भात कागदोपत्री वीस साखर कारखान्यांचे अस्तित्व असले तरी गेल्या काही वर्षांपासून केवळ सात कारखाने गाळप घेण्याच्या स्थितीत शिल्लक असून राज्याच्या साखरेच्या उत्पादनात विदर्भाचा वाटा नगण्य झाला आहे. यंदाच्या हंगामात सात साखर कारखान्यांमध्ये गाळप घेण्यात आले, त्यापैकी तीन साखर कारखान्यांनी उत्पादनही थांबवले आहे. विदर्भातील निम्म्याहून अधिक कारखाने कायमस्वरूपी बंद पडले, अनेक अवसायनात गेले, काही साखर कारखाने खासगी उद्योजकांना देण्यात आले. विदर्भात सहकारी कारखान्यांचे अस्तित्व केवळ एका कारखान्यापुरते आहे.
विदर्भात एका हंगामात अलीकडच्या काळात सुमारे ८ ते ९ लाख मे.टन उसाचे गाळप होते. उसाची उपलब्धतता मात्र ७ ते ७.५० लाख टनापर्यंतच आहे. केवळ १८ हजार हेक्टर क्षेत्रातच उसाची लागवड आहे. विदर्भात वीस कारखान्यांची उभारणी दशकभरापूर्वी करण्यात आली होती. पण मध्यंतरीच्या काळात कारखाने आजारी होऊन बंद पडले. काही कारखान्यांना तर एकाच गाळप हंगामानंतर टाळे लागले. १७ सहकारी साखर कारखान्यांपैकी ११ कारखाने खासगी उद्योजकांना विकण्यात आले. उर्वरित सहा कारखान्यांपैकी यवतमाळ जिल्ह्य़ातील वसंत सहकारी साखर कारखाना एकटा सुरू आहे. सध्या विदर्भातील वसंत सहकारीसह यवतमाळ जिल्ह्य़ातील सागर वाइन, सुधाकरराव नाईक (नॅचरल शुगर), वर्धा जिल्ह्य़ातील महात्मा शुगर, भंडारा जिल्ह्य़ातील वैनगंगा शुगर, नॅचरल ग्रोअर्स आणि नागपूर जिल्ह्य़ातील पूर्ती पॉवर अॅण्ड शुगर, व्यंकटेश्वरा या खासगी कारखान्यांमध्ये ऊस गाळपाची क्षमता आहे. गेल्या हंगामात अमरावती विभागातील दोन कारखान्यांनी २ लाख ४८ हजार मे.टन उसाचे गाळप केले, तर २ लाख ३६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. साखरेचा उतारा हा ९.५३ टक्के होता. नागपूर विभागातील चार खासगी साखर कारखान्यांनी ४ लाख १८ हजार मे.टन ऊस गाळप करून ४ लाख १३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. ऊतारा १०.८४ टक्के होता.
राज्यातील इतर भागांत होणाऱ्या उसाच्या गाळपाच्या तुलनेत विदर्भातील कारखान्यांची क्षमता नगण्य बनली आहे. वीस कारखान्यांची उभारणी करणाऱ्या विदर्भात सहकारी साखर कारखान्यांना दशकभरात घरघर लागली आणि या कारखान्यांचे अस्तित्वच संपुष्टात आले. पण या कारखान्यांपैकी काही कारखाने खासगी उद्योजकांनी आपल्या ताब्यात घेतले, नंतर हेच कारखाने चांगले चालू लागले. सहकारी कारखान्यांच्या भागधारकांमध्ये याचे आश्चर्य आहे. गेल्या चार वर्षांत विदर्भातील ऊस लागवडीच्या क्षेत्रात १२ हजार हेक्टरहून २० हजार हेक्टपर्यंत वाढ झाली आहे. हे चांगले संकेत मानले जात असले, तरी विदर्भातील कारखान्यांमध्ये पूर्ण क्षमतेने गाळप होत नाही, ही शोकांतिका ठरली आहे.
गेल्या पाच वर्षांतला विदर्भातील साखर कारखानदारीच्या कामगिरीचा आलेख चिंताजनक आहे. २००६-०७च्या गाळप हंगामात विदर्भात आठ साखर कारखान्यांनी १३.९९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते आणि १४.८५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. उतारादेखील १०.२० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. २००९-१० मध्ये तर केवळ चार कारखान्यांजवळ गाळप क्षमता शिल्लक होती. या कारखान्यांनी २.५८ लाख मे.टन गाळप आणि २.६१ लाख क्विंटल साखर तयार झाली.
- दशकभरापूर्वी १८ लाख मेट्रिक टनापर्यंत ऊस गाळप करणाऱ्या विदर्भातील साखर कारखान्यांचे गाळप आता ५ लाख मेट्रिक टनापर्यंत खाली आले असून गाळप हंगाम संपण्याच्या बेतात असताना विदर्भात सध्या सुरू असलेल्या सात साखर कारखान्यांमधून केवळ ५.३३ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.
- सध्या विदर्भात सहा खासगी आणि एक सहकारी अशा सात कारखान्यांमध्ये उसाचे गाळप सुरू आहे. आतापर्यंत ५.४३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. साखरेचा उतारादेखील राज्यात सर्वात कमी म्हणजे ९.७२ टक्के आहे.
- विदर्भात १९ सहकारी साखर कारखाने होते, गैरव्यवस्थापनामुळे त्यापैकी ११ कारखान्यांना टाळे लागले आणि त्यांचा लिलाव करण्याची पाळी सरकारवर आली. आता विदर्भात केवळ तीनच सहकारी साखर कारखाने शिल्लक आहेत आणि यंदाच्या गळीत हंगामात केवळ एकाच कारखान्यात गाळप सुरू होऊ शकले.
- विदर्भात सध्या सहा खासगी कारखाने सुरू आहेत. त्यांच्यामुळेच विदर्भ साखर कारखानदारीच्या नकाशावर अजूनपर्यंत टिकून आहे. अमरावती विभागातील कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता ही केवळ ५ हजार मे.टन तर नागपूर विभागातील क्षमता ही ६ हजार २५० मे.टन इतकीच आहे.
- खासगी कारखान्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत गाळप क्षमता वाढवली असली, तरी सहकारी साखर कारखानदारीत मात्र अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
विदर्भात पोषक वातावरण नाही
विदर्भात साखर कारखानदारीसाठी पोषक वातावरणच मुळात तयार झाले नाही. सहकारी तत्त्वावर अनेक कारखाने सुरू करण्यात आले, पण यंत्रसामग्रीपासून ते व्यवस्थापनापर्यंत सर्व काही नियंत्रण सरकारकडून होत असल्याने इच्छाशक्ती असूनही कारखानदारी वाढू शकली नाही. अनेक अनियमितता उघडकीस आली. ऊस लागवडीपासून ते तोडणीपर्यंत मदतीचा अभाव, सरकारी यंत्रणेची अनास्था, तंत्रज्ञानाची कमतरता यामुळे येथील कारखाने पश्चिम महाराष्ट्राशी स्पर्धा करू शकले नाहीत.
– सुनील वऱ्हाडे, सभापती, अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती