‘‘ऊसदराच्या आंदोलनामुळे कारखाने बंद पडले तर शेतकरी ऊस कुठे घालणार? चांगला भाव घेण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे, त्यासाठी बसून निर्णय करावा लागेल, पण आंदोलनामुळे कारखानेच बंद पडायला लागले तर ते योग्य ठरणार नाही,’’ अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आंदोलक शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला.
ऊसदराच्या प्रश्नावर विविध शेतकरी संघटनांचे आंदोलक आक्रमक झालेले असतानाच पवार यांनी हे वक्तव्य केले आणि या प्रश्नावर आपण व सरकार तडजोड करण्याच्या मनस्थितीत नसल्याचेच स्पष्ट केले. रघुनाथ पाटीलप्रणीत शेतकरी संघटनेने टनाला साडेचार हजार रुपये दर देण्याची मागणी केली आहे, तर स्वाभिमान शेतकरी संघटनेने प्रतिटन तीन हजार रुपयांच्या दरासाठी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील कारखान्यासमोर आंदोलन सुरू केले आहे. यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी, शेतकरी हे कारखान्यांचे मालक असल्याने त्यांनी मिळून भाव ठरवावा, असे सांगितले आहे.
 या पाश्र्वभूमीवर पवार शुक्रवारी पुण्यात म्हणाले की, यशवंतराव चव्हाणांच्या काळात बायकांनी मंगळसूत्र मोडून सहकारी कारखानदारी जगवली. शेतकरीच कारखान्याचे मालक आहेत. त्यांनी बसून उसाचे दर ठरवावेत. आंदोलनामुळे कारखानेच बंद पडले तर ऊस कुठे घालायचा. चुकीच्या पद्धतीने मागणी करून कारखाने बंद पडले तर ते योग्य ठरणार नाही.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar factories will shut down due to rate