संगमनेर : राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या संगमनेरच्या भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर फुसका बार ठरल्यात जमा आहे. कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज, बुधवारी ही बाब स्पष्ट झाली. ‘सहकारी चळवळीत राजकारण नको’ अशी आमची भूमिका असल्याने यावेळची संचालक मंडळाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे विरोधकांनी जाहीर केले. सत्ताधारी पक्षातल्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी सबुरीचा सल्ला दिल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वर्चस्वाखालील संगमनेर पाठोपाठ विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या ताब्यातील प्रवरा कारखान्याचीही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
माजी मंत्री थोरात आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विखे यांच्यात लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुकीत झालेला अभूतपूर्व संघर्ष राज्यात गाजला. एकमेकांच्या मतदारसंघात थेट हस्तक्षेप केल्याचे परिणाम दोघांनाही भोगावे लागले. हा संघर्ष ताजा असतानाच आता सहकारातील मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या कारखाना, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय होणार याची मोठी उत्सुकता सर्वांना आहे. या सगळ्या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार असे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी वारंवार स्पष्ट केले होते. त्यापैकी कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याचे त्याकडे लक्ष लागले होते तर दुसरीकडे थोरात यांनी विधानसभेनंतर लगेचच कारखान्याच्या निवडणुकीची तयारी जोरकसपणे सुरू केली होती.
या सगळ्या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या कारखान्याची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आमदार खताळ यांनी सभासदांचा मेळावा घेत निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले होते तर अर्ज भरण्यास सुरुवात होताच थोरात यांनी स्वतःचा अर्ज पहिल्याच दिवशी दाखल करत आपण पूर्ण तयारीत असल्याचा इशारा दिला होता. अगदी काल, मंगळवारी देखील आमदार खताळ यांनी सभासदांचा मेळावा घेत निवडणुकीची तयारी चालवली होती. असे असताना आज, बुधवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी विरोधी गटातील एकाही व्यक्तीचा अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या सगळ्या घडामोडींमुळे थोरात गट कमालीचा सुखावला तर विरोधी आमदार खताळ गटाने पत्रक काढत, सत्ताधाऱ्यांनी मतदार यादीत घोळ घातल्याचा आरोप करत, या वेळची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले.
आमदार खताळ, ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे, वसंतराव गुंजाळ, संतोष रोहम यांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या पत्रकात म्हटले की, साखर कारखान्याने जाणीवपूर्वक सभासद मतदारांच्या शेअर्स रक्कम भरून घेतल्या नाहीत. मयत सभासदांच्या वारसांच्या नोंदी केल्या नाहीत. अकोले तालुक्यातील दोन हजार सभासदांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार नसल्याने सहकार चळवळीतील तत्वाची होत असलेली पायमल्ली लक्षात घेवून यंदाची संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. कारखान्याची निवडणुक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांचा होता. त्यासाठी बैठका होवून प्राथमिक तयारीही सुरु केली होती. तथापि मतदार यादीमध्ये असलेल्या त्रुटी अतिशय गंभीर आणि सहकारी संस्थाच्या कार्यप्रणालीला हरताळ फासणाऱ्या असल्याचा आरोपही पत्रकात करण्यात आला आहे.
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी १३३ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये माजी मंत्री थोरात यांच्या समर्थकांचाच मोठा भरणा आहे. उमेदवारी अर्जांच्या माघारीनंतर संपूर्ण निवडणूक बिनविरोध होते की, काही ठिकाणी लढती होतात याचे चित्र स्पष्ट होईल.