राहाता : जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वर्चस्वाखालील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी आज, बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी विखे गटाकडून २१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विरोधी शेतकरी मंडळाकडून उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्यातच जमा आहे. असे असली तरी १५ ते २९ एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे. त्यानंतरच निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा होईल. सत्ताधारी विखे गटाने संचालकपदी २१ नविन तरूण चेहर्यांना संधी दिली आहे. त्यामुळे जुन्या संचालकांचा अपेक्षाभंग झाला.
मंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे राजकीय हाडवैरी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकाराचा नियम पाळत एकमेकांच्या कारखाना निवडणुकीत हस्तक्षेप न केल्याने यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्येही विखे कारखाना व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. हीच परंपरा दोन्ही नेत्यांनी यंदाही पाळल्याचे स्पष्ट झाले. मंत्री विखे यांचे परंपरागत विरोधक प्रवरा शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याची निवडणूक लढवण्याची रणनीती आखली होती. परंतु त्यांना अपेक्षित राजकीय पाठबळ न मिळाल्याने त्यांनी विखे कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत.
आज, बुधवारी उमेदवार अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. १५ ते २९ एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा कालावधी आहे. त्यानंतरच बिनविरोध निवडणुकीची अधिकृत घोषणा होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर तर तहसीलदार अमोल मोरे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पहात आहेत. बिनविरोध झालेले उमेदवार गटनिहाय खालीलप्रमाणे गट नं. १ आश्वी बुद्रुक – विजय काशिनाथ म्हसे, रंगनाथ भाऊराव उंबरकर, अनिल सावळेराम भोसले. गट नं.२ दाढ बुद्रुक – अशोक बाबासाहेब घोलप, गोरक्षनाथ सोपान तांबे, गट. न. ३ किरण सुधाकर दिघे, प्रकाश लक्ष्मण ताठे, गट नं. ४ लोणी – डॉ. सुजय राधाकृष्ण विखे, रामप्रसाद दगडू मगर. गट नं. ५ कोल्हार – ज्ञानेश्वर रघुनाथ खर्डे, श्रीकांत दशरथ खर्डे, बापूसाहेब चांगदेव कडसकर, गट नं. ६ राजुरी – विजय उत्तमराव कडू, सोमनाथ बाळासाहेब गोरे, दिलीप मुक्ताराम यादव, अनुसुचित जाती- रतन देवजी कदम, इतर मागास प्रवर्ग -सोपान विठ्ठल शिरसाठ, भटक्या जाती विमूक्त जमाती – बाळासाहेब चांगदेव लाटे, सहकारी संस्था – सुनिल भारत तांबे, महिला राखीव – अलकाताई संभाजी देवकर, हिराबाई भास्कर पाटोळे.
प्रवरा शेतकरी मंडळ रिंगणाबाहेर
प्रवरा शेतकरी मंडळाने विखे कारखाना निवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल न केल्याने निवडणूक बिनविरोध पार पडत आहे. मंडळाने निवडणुकीतून जाणीवपूर्वक माघार घेतली. विखे कारखान्याचे सत्ताधारी व प्रशासनाने निवडणुकीत विरोधकांना अडथळ्याची शर्यत पार पाडावी लागेल असेच वर्तन सातत्याने ठेवले. निवडणुकीत आमची माघार हा याचाच परिपाक आहे. शेतकरी मंडळाच्या नेते, कार्यकर्त्यांच्या घरातील ऊस उत्पादक सभासदांना दाखले देताना चक्क खोटे आणि चुकीचे दाखले दिले व त्यांना अपात्र ठरविले. खोट्या दाखल्यांबाबत फौजदारी कार्यवाही आम्ही करणार आहोत.-बी. के. विखे, नेते, प्रवरा शेतकरी मंडळ.