काही दशकांपूर्वी तब्बल वीस साखर कारखान्यांचा डोलारा उभा करणाऱ्या विदर्भातील साखर कारखानदारी पूर्णपणे मोडकळीस येण्याच्या स्थितीत आली आहे. राज्यात यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत २१२ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झालेले असताना विदर्भाचा वाटा केवळ २ लाख मेट्रिक टनाचा आहे. सध्या ४ खाजगी कारखान्यांसह केवळ पाच कारखान्यांमध्ये ऊस गाळप सुरू आहे. साखरेचा उतारादेखील गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने कमी होत चालल्याने धोक्याची सूचना मिळाली आहे.
पुढाऱ्यांनी सहकारी तत्वावर साखर कारखाने उभे करण्याची लाट काही वर्षांपूर्वी विदर्भात आणली, पण एक-दोन गाळपातच अनेक साखर कारखाने बंद पडले. या साखर कारखान्यांची यंत्रसामुग्री धूळ खात पडली असताना विदर्भात खाजगी साखर कारखान्यांनी चांगली कामगिरी केली, तरी ऊसाअभावी हे साखर कारखाने संकटात सापडले आहेत.उपलब्ध आकडेवारीनुसार २० डिसेंबर अखेर राज्यात १०३ सहकारी आणि ५४ खाजगी अशा एकूण १५७ साखर कारखान्यांमध्ये आतापर्यंत २१२.४८ लाख मे.टन ऊसाचे गाळप होऊन २१४.९८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचा उतारा १०.१२ टक्के एवढा आहे. विदर्भाची अवस्था मात्र बिकट आहे. केवळ एक सहकारी आणि चार खाजगी साखर कारखाने यंदा गाळप सुरू करू शकले. २.२५ लाख मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे आणि १.८५ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. विदर्भातील या कारखान्यांनी १५ नोव्हेंबर नंतर गाळप सुरू केले आहे. विशेषत: साखरेचा उतारा राज्यातील इतर विभागांपेक्षा सर्वात कमी म्हणजे केवळ ८.१४ टक्के आहे.
विदर्भात साखर कारखानदारी रूजूच शकली नाही. ऊसाचे अल्प क्षेत्र, ऊस तोडणी कामगारांचा अभाव, नियोजनशून्यता आणि जोड उद्योगांची वानवा यामुळे साखर कारखाने उभे राहण्यापुर्वीच कोलमडले. विदर्भात २० साखर कारखाने उभारण्यात आले, यातील बहुतांश अवसायनात गेले आहेत. काही साखर कारखाने कवडीमोल भावात विकले गेले. विशेष म्हणजे  बहुतांश साखर कारखाने राजकीय पुढाऱ्यांचे आहेत. मोठे अनुदान पदरात पाडून घेणाऱ्या या साखर सम्राटांनी कारखाना बंद पडल्यानंतर शेतकरी आणि त्यावर विसंबून असलेल्या लोकांकडे उलटूनही पाहिले नाही, असा आरोप केला जात आहे.
गेल्या काही वर्षांत विदर्भातील साखर कारखान्यांची कामगिरी सातत्याने खालावत चालली आहे. २००६-०७ च्या हंगामात विदर्भातील ८ साखर कारखान्यांनी १४ लाख मे.टन ऊस गाळप, १४.८५ लाख क्विंटल उत्पादन आणि १०.२० टक्के उतारा मिळवला होता. २००७-०८ मध्ये १० कारखान्यांनी १८.४८ लाख मे.टन गाळप, १९.६९ लाख क्विंटल उत्पादन आणि १०.५ टक्के उतारा घेतला, २००८-०९ मध्ये आठ साखर कारखान्यांची गाळप क्षमता ३.०७ लाख मे.टनापर्यंत रोडावली. केवळ २.९२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन आणि ९.५ टक्के उतारा मिळाला. २००९-१० मध्ये फक्त चारच कारखाने बॉयलर पेटवू शकले. २.५८ लाख मे.टन गाळप, २.६१ लाख क्विंटल उत्पादन आणि ९.५ टक्के उतारा, अशी अवस्था झाली. २०१०-११ च्या हंगामात तीन खाजगी कारखान्यांमुळे थोडी सुधारणा दिसली. पाच कारखान्यांनी ४.३८ लाख मे.टन गाळप, ४.६८ लाख क्विंटल उत्पादन आणि १०.५ टक्के उतारा घेतला, पण यंदा मात्र उत्पादन आणि उताराही कमी येण्याची शक्यता आहे.