ऊस गाळप हंगामाच्या अखेरीस विदर्भातील एका कारखान्याने हंगाम बंद केला असून ऊसाअभावी लवकरच इतर सहा कारखान्यांचाही हंगाम संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. विदर्भात गेल्या वर्षीपेक्षा यंदा ऊस गाळप जास्त झाले असले, तरी साखरेचा उतारा मात्र कमी आला आहे. आतापर्यंत सात साखर कारखान्यांनी ११.०८ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे, तर १०.७८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
सुमारे चार वर्षांपुर्वी २० लाख मेट्रिक टनापर्यंत ऊसाचे गाळप करणाऱ्या विदर्भात साखर कारखान्यांवर अवकळा आली आणि अनेक कारखाने बंद पडत गेले. सहकारी साखर कारखान्यांवर गैरव्यवस्थापन, ऊसाचा अभाव, ऊसतोडणी कामगारांची कमतरता अशा अनेक समस्यांनी आरिष्ट कोसळले. गेल्या काही वर्षांत विदर्भातील १२ सहकारी साखर कारखाने बंद पडले आहेत. यंदा गळित हंगामात अमरावती आणि नागपूर विभागातील १ सहकारी आणि सहा खाजगी कारखान्यांनी ऊसाचे गाळप केले.
अमरावती विभागातील तीन आणि नागपूर विभागातील चार कारखान्यांनी ११.०८ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आणि १०.७८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले, हे गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे. अजूनही हंगाम पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे साखर उत्पादनात आणखी वाढ होऊ शकते. सध्या राज्यातील १६९ साखर कारखान्यांपैकी ९९ कारखान्यांनी हंगाम बंद केले आहेत. राज्यभरात आतापर्यंत ६६७ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप आणि ७५४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यात विदर्भाचा वाटा अत्यंत नगण्य आहे.
गेल्या वर्षीच्या हंगाम विदर्भातील सहा साखर कारखान्यांनी ८.८४ लाख मे.टन ऊसाचे गाळप आणि ९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. यंदा क्षमतेत वाढ झाली, पण ऊतारा कमी आला आहे. गेल्या हंगामात साखरेचा उतारा १०.२ टक्के होता, यंदा तो ९.८३ टक्क्यांवर स्थिरावला आहे. राज्यातील सर्व साखर कारखान्यांचा साखरेच उतारा ११.३१ टक्के आहे. कोल्हापूर विभागात तर १२.४२ टक्क्यांपर्यंत उतारा पोहचला आहे. कमी उतारा हे विदर्भातील साखर कारखानदारीचे जुनेच दुखणे आहे. विदर्भातील साखर कारखानदारीला ऊसाची कमतरता भेडसावत आहे. नियोजनाअभावी अनेक कारखाने यंदा गाळप सुरू करू शकले नाहीत. अनेक कारखाने अवसायनात गेले आहेत, तर काही कारखाने उद्घाटन झाल्यानंतर लगेच बंद पडले, त्यांची यंत्रसामुग्री भंगारात गेली आहे. यात कोटय़वधी रुपयांचा चुराडा झाला आहे.
अमरावती विभागातील हंगाम सुरू असलेल्या साखर कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता ५ हजार ५०० मे.टन आहे. या विभागातील एका सहकारी साखर कारखान्यासह दोन खाजगी कारखान्यांनी ४.४३ लाख मे.टन ऊसाचे गाळप केले, ४.५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. साखरेचा उतारा १०.३४ टक्के एवढा आहे. नागपूर विभागातील एकूण चार खाजगी साखर कारखान्यांनी ६.६५ लाख मे.टन ऊसाचे गाळप केले आणि ६.२० लाख क्विंटल साखर उत्पादित केली. साखरेचा उतारा केवळ ९.३२ टक्के आहे. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत तो सर्वात कमी आहे. विदर्भातील साखर कारखान्यांवर भागभांडवल, कर्ज आणि हमी शुल्काची कोटय़वधी रुपयांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांना ऊस लागवडीत रस उरलेला नसल्याने या कारखान्यांसमोर ऊसटंचाईचे संकट आहे. 

Story img Loader