शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाने राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिसाका कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांच्या घरासमोर सुरू केलेले ठिय्या आंदोलन सलग पाचव्या दिवशीही सुरू आहे. या आंदोलनामुळे आतापर्यंत १७ पैकी नऊ संचालकांनी राजीनामे दिल्याचे आंदोलक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. उर्वरित संचालकांना राजीनामे देण्यासाठी दोन दिवसाची वेळ देण्यात आली असून जे राजीनामा देणार नाहीत, त्यांच्या गावी जावून कामगार त्यांच्या दारात आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
शिसाकाचे अध्यक्ष व्ही. यू. पाटील यांच्यासह संचालक मंडळाने राजीनामा द्यावा या मागणीसाठी कामगारांसह शेतकऱ्यांनी अध्यक्षांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी पाचव्या दिवशीही हे आंदोलन सुरू होते. अद्याप अध्यक्ष पाटील यांच्या घराला ताळे लावलेले आहे. आतापर्यंत मनोहर पाटील, किशोर राजपूत, संजय पटेल, दिनकर पाटील, शेखर पाटील, बबन चौधरी, सुभाष ओसवाल आदी संचालकांनी राजीनामे दिले आहेत. १३ मे रोजी अशोक गंगाराम मराठे व प्रताप हिंमतराव पाटील यांनीही राजीनामे दिल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. एकंदरीत निम्याहून अधिक म्हणजेच १७ पैकी नऊ संचालकांनी राजीनामे दिले आहेत. उर्वरित संचालकांच्या घरी जावून राजीनामे देण्यासाठी आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी आ. अमरिशभाई पटेल यांची भेट घेऊन कारखान्याबाबत तोडगा काढण्यासाठी भेटणार होते. परंतु, त्यांची भेट न झाल्यामुळे निवेदन देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar factory workers agitation enter in fifth day